
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोविड संसर्गाचा धोका कमी!
मुंबई पालिकेच्या रुग्णालयाने केलेल्या अभ्यासातील निष्कर्ष
मुंबई: कोविड लसीचे (Coronavirus Vaccination) दोन डोस (2 doses) घेतलेल्या व्यक्तींना कमी संसर्ग (Infection) होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाने (Seven Hills Hospital) केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला असून लाभार्थ्यांनी आपले दोन्ही डोस ठरलेल्या वेळेत घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाने याबाबत काही रुग्णांचा अभ्यास (Study) केला आहे. या अभ्यासानुसार ज्या रुग्णांनी कोविड लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना पुन्हा विषाणूची (Covid-19) बाधा कमी होत असल्याचे समोर आले आहे. लस घेतलेल्या व्यक्तींना पुन्हा कोविडची बाधा झाल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात कमी वेळ राहावे लागत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ज्या व्यक्तींना दोन डोस घेतलेल्यानंतर चार आठवडे पूर्ण झाले अशांना कोविड झाला तरी तो असीम्टेमॅटिक असल्याचे ही अभ्यासात समोर आले आहे. (Mumbai BMC Hospital study says those who took 2 doses of vaccine have less possibility of covid19 contraction)
सेव्हन हिल रुग्णालयाकडून तीन महिने निरीक्षणे नोंदवण्यात आली. मार्च महिन्यापासून अभ्यासाला सुरुवात करण्यात आली असून कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 23 आणि पहिला डोस घेतलेल्या 94 व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली असल्याची माहिती सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ बाळकृष्ण अडसूळ यांनी दिली. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींपैकी 12 व्यक्तींना मधुमेह,उच्च रक्तदाब अशा प्रकारचा कोणताही त्रास नव्हता असे ही ते पुढे म्हणाले. ज्या व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले होते अशा व्यक्ती संसर्ग झाल्या नंतर घरच्या घरीच बऱ्या झाल्या,तर फार कमी लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले असे ते पुढे म्हणाले. ज्या व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्या त्यांना ही केवळ आठवडाभर रुग्णालयात राहावे लागल्याचे ही त्यांनी सांगितले.
ज्या व्यक्तींना लसींचे दोन्ही डोस घेतले होते त्यांच्या छातीचे सिटी स्कॅन घेतले असता एक डोस घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींचा संसर्ग हा नगण्य होता. दोन्ही डोस घेतलेल्या 23 व्यक्तींपैकी 9 जणांना चार आठवडे कोणताही त्रास जाणवला नाही ते असीम्टेमॅटिक होते तर 16 व्यक्तींना ताप ,अंगदुखी , खोकल्याचा त्रास जाणवला पण कुणालाही श्वास घ्यायला त्रास मात्र झाला नाही असे डॉ राजस वाळींजकर यांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यात दोन्ही डोस घेतलेल्या एका तर एक डोस घेतलेल्या तीन कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्या रुग्णाला इतर गंभीर आजार होते शिवाय त्याचे वय ही 71 वर्ष इतके होते. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना कमी संसर्ग होत असल्याने सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन ही डॉ अडसूळ यांनी केले आहे.
(संपादन- विराज भागवत)