
उद्योगपती मुकेश अंबानी, महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Bomb Blast : बॉम्बस्फोटाबाबतची खोटी माहिती; शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी, महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती नागपूर येथील हेल्पलाइन 112 क्रमांकाला दिल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी बुधवारी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे. दरम्यान, दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘नागपूर 112’ या हेल्पलाइनवर मंगळवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास राजेश कडके नावाच्या व्यक्तीने दूरध्वनी केला होता. या वेळी त्याने मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमातील दिलीप जोशी यांच्या घरासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यातील 25 नागरिकांकडे बंदुका आणि बॉम्ब असून ते मुकेश अंबानी, धर्मेद्र आणि अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ स्फोट करू शकतात, असे सांगितले. त्यानंतर ‘नागपूर 112’ हेल्पलाइन क्रमांकावरून तात्काळ याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली.
पण पोलीस तपासात ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भादंवि कलम 505 (1), 506 (2) व 182 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.