
Mumbai Crime : बुकी अनिल जयसिंघानीला अन्य एका गुन्ह्यांत अटक
मुंबई - मलबार हिल पोलिसानंतर ईडीच्या ताब्यात असलेल्या बुकी अनिल भगवानदास जयसिंघानी याला अन्य एका गुन्ह्यांत अंधेरी पोलिसांनी अटक केली. बोगस क्रमांक लावून कारचा वापर केल्याचा त्याच्यावर आरोप असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
यातील तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून ते उल्हासनगर येथे राहतात. अनिल जयसिंघानी हा त्याचा व्यावसायिक मित्र होता. मात्र नंतर त्यांच्यात व्यावसायिक वाद झाला आणि त्यातून अनिल जयसिंघानीने त्याला धमकी देण्यास सुरुवात केली होती. त्यांना खोट्या गुन्ह्यांत अटक व्हावी यासाठी त्याने एका महिलेच्या मदतीने गोवा येथे तक्रारदाराविरुद्ध लैगिंक अत्याचाराच्या एका गुन्ह्यांची नोंद करण्यास प्रवृत्त केले होते.
गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी गोवा पोलीस मुंबईत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनिल जयसिंघानी हादेखील एका कारमध्ये होता. अनिल हा त्याचे अपहरण करण्याच्या उद्देशाने आल्याचे समजताच त्यांनी साकिनाका पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्याच्या कारचा क्रमांक देऊन त्याने अनिल जयसिंघानीविरुद्ध तक्रार केली होती. तपासात अनिलने ज्या कारचा वापर केला होता, ती कार दुसर्या व्यक्तीच्या नावावर होती. त्याने बोगस क्रमांकावर या कारचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
त्यामुळे त्याच्याविरुद्ध साकिनाका पोलिसांनी बोगस दस्तावेज बनविणे तसेच मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर अंधेरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. गेल्या गुन्ह्यांत गेल्या सात वर्षांपासून तो वॉण्टेड होता. अलीकडेच अनिल जयसिघांनी याला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देणे आणि खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर मनी लॉंड्रिंगप्रकरणी त्याचा ताबा ईडीने घेतला होता.
याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल जयसिंघानीला शनिवारी अंधेरी पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अनिल हा बुकी असला तरी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे, राजस्थान, गोवा राज्यात सतराहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून यातील बहुतांश गुन्ह्यांत तो पाहिजे आरोपी आहे. त्यामुळे त्याचा संबंधित गुन्ह्यांत इतर पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.