Special Report | शासकीय रुग्णालयांचीही अग्निसुरक्षेबाबत हलगर्जी; उपाययोजनांकडे सर्रास दुर्लक्ष

Special Report | शासकीय रुग्णालयांचीही अग्निसुरक्षेबाबत हलगर्जी; उपाययोजनांकडे सर्रास दुर्लक्ष

मुंबई - मुंबईतील महापालिका आणि राज्य शासनाची रुग्णालये ही वर्षभर गर्दीने ओसंडून वाहतात. जीव वाचवण्याच्या उद्देशाने हजारो रुग्ण शासकीय रुग्णालयात येत असतात; मात्र हीच रुग्णालये केव्हाही रुग्णांच्या जीवावर उठण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील पालिका आणि राज्य सरकारच्या बहुतांश रुग्णालयांकडे अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे अग्निशमन दलाच्या पाहणीत आढळले. मुंबईतील केवळ चारच शासकीय रुग्णालयांतील अग्निसुरक्षेच्या उपाययोजना अद्ययावत केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 27 रुग्णालयांकडे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचेही समोर आले आहे. 

भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानुसार मुंबईतील दीड हजारांहून अधिक रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये राज्य सरकार आणि पालिका रुग्णालयांचा समावेश होता. या मोहिमेत केवळ चार रुग्णालयांनी अग्निसुरक्षेची उपाययोजना केल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी 34 शासकीय रुग्णालयांतील अग्निसुरक्षेची यंत्रणा कुचकामी असल्याची; तर सहा रुग्णालयांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना पूर्ण केल्या नाही; तर तब्बल 27 रुग्णालयांकडे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे या तपासणीतून उघडकीस आले. अग्निशमन दलाने या रुग्णालयांना नोटीस बजावल्या असून यंत्रणेतील त्रूटी दूर करण्यासाठी आणि आग रोधक यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी एक ते तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यानंतर अग्निशमन दलाकडून या रुग्णालयांची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

काय आहेत अडचणी? 
मुंबईतील शासकीय रुग्णालये ही राज्यासह देशभरातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी मोठा आधार आहेत. त्यात अनेक रुग्णालयाचे बांधकाम जुने आहे. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या नियमावलीचे पालन करणे कठीण आहे; मात्र तरीही आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश रुग्णालयांत आगीच्या पूर्वी सूचना देणाऱ्या उदा. स्मोक डिटेक्‍टर, स्प्रिंकलर्स यंत्रणा नाहीत. भंडारा रुग्णालयात स्मोक डिटेक्‍टिंग यंत्रणा नसल्यामुळे 11 बालकांना जीव गमावावा लागला होता. 

रुग्णालयांमध्ये आढळलेल्या त्रुटी 

  • - बहुतांश रुग्णालयाचे जुने बांधकाम 
  • - आगीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेचा अभाव 
  • - बहुतांश रुग्णालयात स्मोक डिटेक्‍टर्स, स्प्रिंकलर्सचा अभाव 
  • - आगप्रतिबंधक यंत्रणेची नियमित चाचणी नाही 
  • - अनेक रुग्णालयांचे इलेक्‍ट्रिक व फायर ऑडिट नाही 
  • - अग्निसुरक्षेची यंत्रणा अद्यावत करण्याकडे दुर्लक्ष 

मुंबईतील अनेक रुग्णालयांनी अग्निसुरक्षेच्या नियमांची पूर्तता केलेली नाही. त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र जाणीपूर्वक निष्काळजीपणा करणाऱ्या रुग्णालयांना पालिका पाठीशी घालणार नाही. रुग्णालयांना अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करावेच लागेल. 
- सुरेश काकाणी,
अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका. 

महापालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना परिपूर्ण असणे गरजेचे आहे. त्यामध्ये सुसूत्रता आणून त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखण्याबाबत दिशानिर्देश जारी करण्यात येतील. 
- राजेंद्र पाटील यड्रावकर,
आरोग्य राज्यमंत्री 

या रुग्णालयांतील अग्निशमन यंत्रणेत दोष 
- कामा ऍण्ड आल्बेस रुग्णालय, फोर्ट 
- सेंट जॉर्ज दंतमहाविद्यालय, फोर्ट 
- जगजीवन राम रुग्णालय, नागपाडा 
- स्टेट जनरल रुग्णालय, मालाड 
- ईएसआयएस रुग्णालय, कांदिवली 
- कस्तुरबा रुग्णालय, महालक्ष्मी 
- नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल 
- केईएम रुग्णालय, परळ 
- जीटीबी रुग्णालय, शिवडी 
- कूपर रुग्णालय, अंधेरी 
- शीव रुग्णालय, शीव 
- भाभा रुग्णालय, वांद्रे 
- भाभा रुग्णालय, कुर्ला 
- शताब्दी रुग्णालय, गोवंडी

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai breaking marathi Government hospitals also neglect fire safety special report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com