
Mumbai : गरिबांच्या बर्गरला महागाईची झळ
तुर्भे- भुकेच्या वेळी पोटाला आधार देणारा गरिबांचा बर्गर अर्थात वडापाव लवकरच महाग होणार आहे. पाव तयार करण्यासाठी लागणारी सामग्री महागल्याने बेकर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईकडून पावाच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आल्याने त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवरदेखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चटकदार खाण्याची आवड असलेल्यांसाठी वडापाव म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. सकाळी लवकर घराबाहेर पडणारे, हातावर काम असलेल्या चाकरमान्यांसाठी अनेकदा वडापावचाच आधार घ्यावा लागत आहे. अशातच नवी मुंबईमध्ये पावाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.
रविवारपासून नवी मुंबईमध्ये पावाचे भाव वाढले. कारण मैद्याचा भाव सध्या १,८५० रुपये प्रतिपोते गेला असल्याने, तसेच पावाच्या भट्टीसाठी लागणारे अन्य सामानदेखील महागले असल्याने पाव उत्पादनासह विक्री खर्चात वाढ झाली आहे.
परिणामी, पावाच्या प्रत्येक लादीमागे एक रुपया वाढवल्याची माहिती बेकर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे चेअरमन अकबर शेख यांनी एका पत्रकार परिषदेमधून दिली आहे. त्यामुळे पावाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम वडापाव, तसेच पावभाजी, मिसळपाव, सॅण्डवीच आदींच्या किमतीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महागाईची झळ सर्वच जीवनावश्यक वस्तूंना बसली आहे. गोरगरिबांच्या आवाक्यातील वडापावही आता १८ ते २० रुपयांना मिळण्याची शक्यता आहे.
मैद्याचे भाव वारंवार वाढत असल्याने बेकरी खाद्य उत्पादक व्यावसायिक संकटात सापडले आहेत. यावर एकत्रित पर्याय शोधण्यासाठी झालेल्या बैठकीत बेकर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईने पावाच्या किमतीत प्रतिलादी एक रुपया दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाव महागल्याने साधारणपणे १२ ते १५ रुपयांना मिळत असलेला वडापाव आता १८ ते २० रुपये किमतीने विकला जाण्याची शक्यता आहे. तसेच पावाशी निगडित असलेला समोसा, मिसळ पाव आणि पावभाजीदेखील महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भूक लागल्यावर वडापाव खाण्यापूर्वी आधी खिसा तपासावा लागणार आहे.
पावासाठीच्या मैद्याचे ५० किलोचे पोते २०२१ मध्ये १२०० ते १४०० रुपये होते. २०२२ मध्ये १६०० रुपयांच्या घरात गेले, तर २०२३ मध्ये हाच मैदा १८५० इतका वाढला आहे. पावाच्या भट्टीसाठी लागणारे अन्य सामानदेखील महागले आहे. यामुळे पावाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या खर्चात वाढ झाली आहे.
- अकबर शेख, चेअरमन, बेकर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई