Mumbai : पंधरा तास ५० मिनिटात कर्नाक उड्डाणपूल झाला इतिहासात जमा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rail

Mumbai : पंधरा तास ५० मिनिटात कर्नाक उड्डाणपूल झाला इतिहासात जमा!

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दीडशे वर्षांहून अधिक जुना कर्नाक उड्डाण पूलाचे पाडकाम वेळे आधी पूर्ण करण्यात आले आहे. तब्बल १७ तासांनंतर सीएसएमटीतून पहिली लोकल धावली आहे. सीएसएमटी स्थानकातून ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल दुपारी ३. ५० वाजता चालविण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक १९ तासानंतर सुरू करण्यात आली आहे. सीएसएमटी स्थानकांतून पनवेलच्या दिशेने पहिली लोकल लोकल ५. ५२ वाजता चालविण्यात आली. मात्र, मध्य रेल्वेने कर्नाक उड्डाण पूल पाडण्यासाठी घेण्यात आलेल्या २७ तासांचा मॅगब्लॉकमुळे रविवारी दिवसभर प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहे.

कर्नाक उड्डाणपूल मध्य रेल्वेवरील सर्वात जुना पूल म्हणून ओळखला जातो. सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकातील कर्नाक पुलाची निर्मिती १९६८ मध्ये झालेली असून, त्यास १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा पूल धोकादायक ठरविण्यात आला होता. मध्य रेल्वे हा पूल पाडण्यासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. या कर्नाक पुलाचे पाडकाम शनिवार रात्री ११ वाजल्यापासून सुरु झाले. पहिल्या टप्यात सीएसएमटी ते कल्याण दरम्यान १७ तासांचा मेगाब्लॉक घेऊन दुपारी ४ वाजता सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची अप-डाउन धिम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील वाहतुक सुरु करण्यात आली. हार्बर मार्गावर २१ तासांचा ब्लॉक

घेण्यात आला होता. मात्र, वेळापत्रकाच्या आधी हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ५.४६ वाजत पूर्ववत केली आहे. हार्बर मार्गावरील पहिली ट्रेन पनवेल-वडाळा लोकल वडाळा येथून ५.४६ वाजता सीएसएमटीसाठी रवाना झाली आणि सीएसएमटी-पनवेल लोकल सीएसएमटी स्थानकांवरून ५. ५२ मिनिटांनी रवाना झाली आहे. सध्या सातवी मार्गिका आणि यार्ड मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे आणि नियोजित वेळापेक्षा काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

१५ तास ५२ मिनिटात -

मध्य रेल्वेने कर्नाक उड्डाण पूल पाडण्याचे काम शनिवारी रात्री ११ वाजता सुरू केले.प्रत्येक्षात हा पूल पाडण्याचे काम रविवारी दुपारी २ वाजून ५२ मिनिटांत पूर्ण करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. हा पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेला १५ तास ५२ मिनिटांचा कालावधी लागलेला आहे. पूल पाडून झाल्यानंतर ओव्हर हेड वायर जोडण्यात आले आहे.

मनुष्यबळ कामगार - ४००

रेल्वे अधिकारी - ३५

सुपरवायझर - १००

तीन क्रेन - ३५० टन क्षमतेच्या

एक क्रेन ५०० टन क्षमतेची

टॉवर वेगन ६

गॅस कटरचा वापर

गॅस सिलेंडर -३००

मुंबईकरांचे अतोनात हाल-

या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळ्यापर्यतची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी दादर,ठाणे,कल्याण,वडाळा स्थानकातून स्पेशल लोकल चालविण्यात आल्या होत्या. परंतु विशेष लोकलची संख्या खूपच कमी असल्याने दादर, कुर्ला, डोबिवली आणि ठाणे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळी होती.त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. तसेच सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा दरम्यान लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांना ईतर पर्यायी साधनांचा वापर करावा लागला. बेस्टने जादा बस सोडल्या असल्या तरी प्रवाशांची संख्या पाहत्या त्या अपुऱ्या होत्या. रिक्शा-टक्सीने प्रवास करण्यास प्राधान्य दिले. परंतु भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली.

सर्व मार्ग आणि सीएसएमटी स्थानकावरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने हे एक मोठे आणि आव्हानात्मक काम होते. मात्र, सूक्ष्म नियोजन आणि स्थानीय नागरी संस्थांशी योग्य समन्वयामुळे आम्हाला हे प्रचंड काम नियोजित वेळेआधी पूर्ण करता आले. अनेक मोठ्या क्षमतेच्या क्रेन आणि इतर यंत्रसामुग्रीच्या तैनातीमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि टीम वर्कमुळे हे काम जलदगतीने पूर्ण करण्यात मदत झाली. या मेगा ट्रॅफिक ब्लॉकचा उपयोग मोठ्या प्रमाणात इतर कामांसाठी देखील करण्यात आला.

- अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे,

काय आहे इतिहास-

- १८६८ साली  कर्नाक उड्डाण पुलाची निर्मिती 

- १८५८ कर्नाक उड्डाण पुल बांधण्याची सुरुवात

- तब्बल दहा वर्षांत बांधला गेला पूल

- मध्य रेल्वेवरील सर्वात जुना आणि उंचीने लहान उड्डाण पुल म्हणून कर्नाक पूल ओळखला जातोय.

- बॉम्बेचे गव्हर्नर जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्या नावावरून या पुलाला कर्नाक पूल असे नाव देण्यात आले.

- इंग्रजी, मराठी व गुजराती या तिन्ही भाषेत पुलाचे हे नाव तीन कोपऱ्यांत कोरलेले आहे.