आक्षेपार्ह जाहिरातीच्या उत्पादकांवर FDAची धाड; 7 लाख 60 हजारांचा माल जप्त | Ayurvedic company update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FDA

आक्षेपार्ह जाहिरातीच्या उत्पादकांवर FDAची धाड; 7 लाख 60 हजारांचा माल जप्त

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मासिक पाळी असा उल्लेख असणाऱ्या आयुर्वेदिक कंपन्यांविरोधात (Ayurvedic company) अन्न व औषध प्रशासनाने (FDA) न्यायालयीन कारवाईची घटना ताजी असतानाच पुन्हा अशी प्रकरणं एफडीएच्याच्या निदर्शनास आली आहेत. मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथील हर्बोलॅब प्रा.लि. या खासगी आयुर्वेदिक कंपनीच्या उत्पादकांवर आक्षेपार्ह जाहिरातींवर (Offensive advertisement) ठपका ठेवत एफडीएने तब्बल 7 लाख 60 हजारांचा माल जप्त केलाय.

हेही वाचा: कल्याण : मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक

पुरुषांमध्ये कामवासना वाढवणं, स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित करणं, मुतखडा बरा करणं, उच्च रक्तदाब कमी करणं, मधुमेह बरा करणं अशा जाहिराती हर्बोलॅब प्रा.लि. कंपनीच्या उत्पादनांवर आढळून आल्यात. एफडीच्या रामेश्वर डोईफोडे आणि राजेश बनकर या औषध निरीक्षकांनी 4 ऑक्टोबरला हर्बोलॅब प्रा.लि. या कंपनीच्या मुंबई सेंट्रलच्या कार्यालयाला भेट दिली होती. कंपनीच्या हर्बो टर्बो लॅब, पुनावा पिल, सायक्लॉ हर्ब, डायबॅक्स ब्लिस, हर्बो काल्म, रॅनो हर्ब्स आदी उत्पादनांवर आक्षेपार्ह जाहिराती एफडीएच्या अधिका-यांना आढळल्या. या सगळ्या उत्पादनांचा माल एफडीएने हस्तगत केलाय.

"आजार बरा करतो, याबाबतच्या जाहिराती देताना अन्न व औषध प्रशासनाने काही नियम तयार केले आहेत. काही आजारांचा उल्लेख उत्पादनांवर करता येत नाही, अन्यथा संबंधित कंपनीवर औषधे औषधे व जादूटोनादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954) कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयीन कारवाई केली जाते."

जी.बी.काळे, सहआयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन

सुरुवातीला डॉ वैद्याज या संकेतस्थळावर आयुर्वेदिक औषधांच्या आक्षेपार्ह जाहिराती एफडीएच्या अधिका-यांना आढळून आल्या. त्याप्रकरणानंतर 4 ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल येथील हर्बोलॅब प्रा.लि. या आयुर्वेदिक कंपनीला एफडीएच्या अधिका-यांनी भेट दिली. आक्षेपार्ह उत्पादनं जप्त केल्यानंतर तपास पूर्ण होताच, न्यायालयीन कार्यवाही केली जाईल, असंही एफडीएनं स्पष्ट केलंय.

loading image
go to top