
मुंबई : चेंबूर सिद्धार्थ कॉलनीची थकबाकी अदाणी कडून वीजपुरवठा खंडित
मुंबई: चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमधील विजबिलांच्या शंभर कोटी रुपयांहून जास्त थकबाकीचे प्रकरण आता चांगलेच चिघळले असून आज सकाळी अदाणी इलेक्ट्रिसिटीने वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अनेक प्रयत्न करूनही थकबाकी वसूल होत नसल्याने या कारवाईचे अदाणी ने समर्थन केले आहे.
वसाहतीचा पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या विकासकांनी वसाहतीचे वीजबील भरण्याचे आश्वासन दिल्याचा सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांचा दावा आहे. परिसरातील पुनर्विकासाबाबत आजतागायत कोणतीही प्रगती झालेली नाही आणि विजबिलांची थकबाकीही १०२ कोटी रुपयांहून जास्त झाली आहे. थकबाकी वसुलीसाठी अदाणी वीज कंपनी दरवेळी प्रयत्न करते. मात्र आंदोलने आणि निदर्शनांमुळे या प्रयत्नांना खीळ बसल्याचे अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. ने दाखवून दिले आहे.
वीज कायद्यांतर्गत ग्राहक हिताचे संरक्षण करण्यासाठी वीजचोरी आणि थकबाकी यांच्याविरुद्ध कारवाई करणे हे प्रत्येक वीज वितरण कंपनीला बंधनकारक आहे. त्यामुळे याप्रकरणीही अदाणी ने कठोर भूमिका घेतली आहे. तरीही मानवतावादी दृष्टीकोनातून कंपनीने रहिवाशांच्या थकबाकी चुकती करण्याच्या आश्वासनावर विसंबून अनेकदा वीजपुरवठा सुरुही केला होता. मात्र अनेक स्वार्थी दबावगट रहिवाशांची दिशाभूल करीत असून कंपनीचे प्रयत्न हाणून पाडत असल्याचा अदाणी चा दावा आहे.
"सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांनी थकबाकी भरली नसतानाही ते वीज पुरवठ्यासाठी पात्र आहेत असे मानणे चुकीचे आहे. हे थकबाकीदार नेहमीच कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामातही अडथळा आणतात. कर्मचाऱ्यांना नेहमीच धमक्या, गैरवर्तन, कामात अडथळे आदींना सामोरे जावे लागते. अनेक ग्राहकांनी खंडित वीज पूर्ववत करून वीजचोरी सुरू केली आहे. त्यामुळे कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि नियमित वीजबिल भरणा-या ग्राहकांच्या हितासाठी सिद्धार्थ कॉलनीतील थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा हक्क आम्हाला आहे", असेही अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
Web Title: Mumbai Chembur Siddharth Colony Power Cut Adani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..