Mumbai : छठ पूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करा, शिंदे गटाने मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhath Puja 2021

Mumbai : छठ पूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करा, शिंदे गटाने मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबईत राहणारे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी उत्साहात साजऱ्या करत असलेल्या छठ पूजेसाठी मुंबईत जागोजागी कृत्रिम तलाव तयार करावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेला छठ पूजेसाठी गणेशोत्सवाप्रमाणेच कृत्रिम तलाव तयार करावेत असे निर्देश दिले आहेत.

मुंबईत राहणारे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी छठ पूजा मोठ्या भक्तीभावाने साजरी करतात. यावेळी उगवत्या सूर्याला अर्ध्य दाखवून पूजा केली जाते. या पूजेसाठी स्नान करण्याची देखील परंपरा आहे. मुंबई शहरातील सर्व समुद्रकिनारे, तलाव, जलाशय याठिकाणी त्या त्या भागात राहणारे उत्तर भारतीय छठ पूजा साजरी करण्यासाठी येतात. मात्र छठ पूजा साजरी करताना देखील पर्यावरणाचे रक्षण व्हावे अशी इच्छा उत्तर भारतीय नागरिकांना देखील जाणवत होती.

शहरातील नैसर्गिक जलाशय, तलाव यांना बाधा पोहचू नये यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन छठ पूजेसाठी पालिका प्रशासनाने आम्हाला कृत्रिम तलाव उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समन्वयक आशिष कुलकर्णी यांनी एक निवेदन देऊन छठ पूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करावेत अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

गतवर्षी देखील मुंबई महानगरपालिकेने छठ पूजेसाठी काही जागी कृत्रिम तलाव तयार करून भाविकांना ती सोय उपलब्ध करून दिली होती. यंदा देखील तशीच सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उत्तर भारतीय बांधवांकडून करण्यात आली होती. या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना याबाबत निर्देश दिले असून पालिका प्रशासनाने ही सोय यंदादेखील छठ पूजेसाठी उपलब्ध करून द्यावी असे आदेश दिले आहेत.

टॅग्स :MumbaiEknath Shinde