सिटी सेंटर मॉल आगः 22 लाख लीटर पाण्याने विझली आग

समीर सुर्वे
Sunday, 25 October 2020

नागपाडा येथील सेंटल मॉलला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 22 लाख लीटर पाणी वापरण्यात आले. तब्बल 38 तास सेंटल मॉल मधील आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाचे जवान झगडत होते.

मुंबईः नागपाडा येथील सेंटल मॉलला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 22 लाख लीटर पाणी वापरण्यात आले. देवनार डंपिंगला 2016 मध्ये लागलेल्या आगीनंतर ही सर्वाधिक काळ लागलेली आग आहे. तब्बल 38 तास सेंटल मॉल मधील आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाचे जवान झगडत होते.

देवनार डंपिंग येथील 2016 मध्ये भीषण आग लागली होती. या आगीमुळे मुंबईतील हवेचा दर्जाही खालावला होता. तसेच,उपग्रहांच्या छायाचित्रातूनही ही आग दिसत होती. त्यानंतर मंत्रालय, लोअर परळ कमाल मिल कंपाऊंड येथेही विनाशकारक आगी लागल्या होत्या. मात्र,या आगी 12-14 तासात नियंत्रणात आल्या होत्या. मात्र,सेंटल मॉलची आग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 38 तास लागले. गुरुवारी रात्री 8.45 वाजल्याच्या सुमारास लागलेली आग शनिवारी सकाळी 11  वाजल्यानंतर पूर्णपणे नियंत्रणात आली.

मॉल हा पूर्ण इलेक्ट्रॉनिक गॅझेटचे विक्रेते आहेत. सुमारे 300  दुकाने असून दुसरा आणि तिसरा मजला पूर्णपणे खाक झाला आहे.  पहिल्या आणि तळमजल्यालाही आगीची धग बसली आहे. लॉकडाऊनमुळे बेजार झालेल्या व्यापाऱ्यांसाठी दसरा दिवाळी हा व्यवसायचा मोसम होता. मात्र,या आगीत कोट्यावधीचे साहित्यही खाक झाले आहे.

अधिक वाचा-  मुंबई पालिकेनं सुरु केलेले संध्याकाळचे दवाखाने मार्च महिन्यापासून बंदच

इलेक्ट्रॉनिक साहित्य, खोके तसेच प्लास्टीकमुळे ही आग वेगाने पसरत केली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र,आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाचे सहा जवान अधिकारी गुदमरल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावे लागले. या आगी बरोबरच मोठ्या प्रमाणात धुर निर्माण होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. 36 तास चाललेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 22 लाख लीटर पाण्याचा वापर करण्यात आला. तब्बल 223 टॅंकर पाणी वापरण्यात आले. देवनार डंपिंग ला लागलेली आग तीन दिवसात नियंत्रणात आली होती. मात्र,आग सहा दिवस धुमसत होती.
 
रहिवाशी सुरक्षित

या मॉलच्या बाजूला असलेल्या ऑर्किड एनक्लेव्ह ही इमारत संपूर्णपणे रिकामी करण्यात आली होती. शुक्रवार पहाटे पासून शनिवार दुपार पर्यंत हे ३५०० रहिवाशी घरा बाहेरच होते. समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख हे या इमारतीतील रहिवाशी आहे..सर्व रहिवाशी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai City Center Mall fire 22 lakh liters of water ignited the fire


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai City Center Mall fire 22 lakh liters of water ignited the fire