
मुंबई महानगर पलिकेने कोरोना काळात केलेल्या खर्चाबाबत आता संशय निर्माण होत आहे. कोरोना काळातील खर्चाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी माहिती मागवूनही मिळत नाही.
मुंबई : कोरोना काळात महापालिकेने केलेल्या खर्चाबाबत आता संशय निर्माण होत आहे. कोरोना काळातील खर्चाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी माहिती मागवूनही मिळत नाही. त्यामुळे अखेर लेखापरीक्षण विभाग आता थेट महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवणार आहे.
कोरोना काळात महापालिकेने 1600 कोटींहून अधिक खर्च केला. त्यावेळी स्थायी समितीची बैठक होत नसल्याने प्रशासनाला विशेषाधिकार देण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाकडून हा खर्च करण्यात आला. स्थायी समितीच्या नियमित बैठका सुरु झाल्यानंतर प्रशासनाकडून झालेल्या खर्चाची माहिती स्थायी समितीत सादर करण्यात आली. मात्र, ही माहिती तपशीलवार नसल्याचा आक्षेप घेत आतापर्यंत 150 हून अधिक प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविण्यात आले. तसेच या खर्चाचे पालिकेच्या लेखापरीक्षण विभागामार्फत परीक्षण करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले होते. त्यानुसार हे लेखापरीक्षण सुरु करण्यात आले. कोरोनाशी संबंधीत असलेल्या 67 अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लेखापरीक्षण विभागामार्फत सूचनाही करण्यात आल्या; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता लेखा परीक्षण विभागामार्फत थेट आयुक्तांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
विशेषाधिकार रद्द करा!
कोरोनावेळी पालिकेने केलेल्या खर्चाबाबत वेळोवेळी आक्षेप घेण्यात आले. भाजपचे आमदार ऍड. आशीष शेलार यांनी विधीमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनीही या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर प्रशासनाला दिलेले विशेषाधिकार रद्द करण्याचा ठरावही स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे.
लेखापरीक्षणाची कार्यवाही सुरु आहे. संबंधित अधिकाऱ्यांबरोबर करण्यात येत असलेला पत्रव्यवहार हा कार्यवाहीचा भाग आहे. हे काम प्राधान्यांने होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- सीताराम काळे,
प्रमुख लेखापरीक्षक, महापालिका
mumbai city news Doubts about Corona equipment spending of BMC
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )