esakal | गोरेगाव : आरेतील रहिवाशांच्‍या शंकांचे निरसन
sakal

बोलून बातमी शोधा

aarey colony

गोरेगाव : आरेतील रहिवाशांच्‍या शंकांचे निरसन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव : आरे परिसरासह गोकुळधाम व साईबाबा नगर संकुलामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. आरेच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचे हल्ले व रहिवाशांना होणारे दर्शन यामुळे भयभीत झालेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी पुढाकार घेतला आहे. वनखात्याच्या सबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्‍यांनी चर्चासत्र आयोजित केले. या चर्चासत्रात नागरिकांच्‍या विविध प्रश्‍‍नांचे निरसन करण्‍यात आले.

आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ३१ मधील लक्ष्मी उंबरसाडे व अन्य एका व्यक्तीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. साईबाबा संकुल परिसरातसुद्धा रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर झाल्यानंतर या संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्‍यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रभाग ५२ च्या भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी तातडीने आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

हेही वाचा: आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी व त्यावरील उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा व माहिती सत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रासाठी वनपाल नारायण माने, वनरक्षक सुरेंद्र पाटील, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी शैलेश सोन सिंग, वैभव पाटील, दिनेश गुप्ता उपस्थित होते. यावेळी स्थानिक रहिवासी, विविध सोसायट्यांचे सुरक्षारक्षक व आरे वसाहतींमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वनविभागाचा पुढाकार

लँडमार्क हॉल, साईबाबा कॉम्प्लेक्स येथे झालेल्‍या कार्यक्रमास रहिवाशांनी गर्दी करून मनातील शंकांचे निरसन करून घेतले. बिबट्याचा वावर तसेच त्याच्या हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण याबाबत माहिती व जंगली प्राण्यासंदर्भात नागरिकांनी काय करावे व काय करू नये, या विषयाची माहिती देऊन नागरिकांच्‍या मनातील शंका व भीती कमी करण्याचा प्रयत्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. या वेळी बिबट्याला पकडून दूर जंगलात नेण्याची नागरिकांनी मागणी केली. त्यावरही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यानी सकारात्मक प्रतिसाद दिला.

loading image
go to top