मुंबईतल्या कोरोना संदर्भात आली मोठी अपडेट, जाणून घ्या

पूजा विचारे
सोमवार, 13 जुलै 2020

महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली येऊ लागल्याचं समोर आलं आहे.

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमशान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या समोर येतात. त्यातच मुंबई शहरात या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसते. रविवारी मुंबईत 1263 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 92,720 झाली आहे. मात्र अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे.

कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी राज्य सरकारसह आरोग्य यंत्रणेनंही कंबर कसली आहे. त्यातच महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली येऊ लागल्याचं समोर आलं आहे. 

संपूर्ण मुंबईत रुग्णवाढीचा वेग १.३९ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस इतका झाला आहे. वांद्रे परिसरात हा कालावधी तब्बल १४० दिवसांवर पोहोचला आहे. तर डोंगरी, कुर्ला, माटुंगा या भागात ७९ ते ९८ दिवसांपर्यंत वाढला आहे. राज्याच्या राज्याच्या नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी फेसबुक पोस्टच्याद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

 

रुग्ण संख्या आटोक्यात येणं हा 'मुंबई पॅटर्न' असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा पॅटर्न आता देशभरात नावाजला जात असून, यामागे पालिकेनं राबवलेले 'चेस द व्हायरस' हे धोरण परिणामकारक ठरल्याचे त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये स्पष्ट केलंय. 

मे आणि जून या दोन महिन्यांत मुंबईत करोनाचा कहर सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आलेख खाली येण्यास सुरुवात झाली आहे.  

असा वाढला आलेख 

मुंबईमध्ये १४ ते २० जून या कालावधीमध्ये ८४९८ नव्या रुग्णांची नोंद झाली. २१ जून ते २७ जून या आठवड्यात ८९२३, २८ जून ते ४ जुलैमध्ये ८९८५ तर ५ ते ११ जुलै या कालावधीमध्ये ८५०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजे सुमारे ५०० रुग्ण कमी झाले आहेत.  दुसरीकडे २२ मार्च, २०२० रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ तीन दिवस होता. १५ एप्रिलला ५ दिवस, १२ मे रोजी १० दिवस, २ जूनला २० दिवस, १६ जून रोजी ३० दिवस, २४ जून रोजी ४१ दिवस नोंदविण्यात आला होता. रविवारी १२ जुलै रोजी हा कालावधी तब्बल ५० दिवसांवर पोहोचला आहे.

रुग्णसंख्येत होणाऱ्या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होतेय. २४ जूनला हा दर सरासरी १.७२ टक्के एवढा होता. तो १२ जुलैला सरासरी १.३९ टक्के एवढा झाला आहे. विभागस्तरीय आकडेवारीनुसार सर्वांत कमी दर हा वांद्रे एच पूर्व विभागात ०.५ टक्के, डोंगरी बी विभागामध्ये ०.७ टक्के, कुर्ला एल विभागात ०.८ टक्के आणि माटुंगा एफ उत्तर विभागात ०.९ टक्के नोंदवण्यात आला आहे. उर्वरित २० विभागांपैकी ११ विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा हा १.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

दरम्यान, मुंबईतला मिळालेलं हे यश विविध आघाड्यांवर लढणाऱ्या प्रत्येक पालिका कर्मचाऱ्यांचे असल्याचे म्हैसकर म्हणाल्या. कोरोनाची लस येईपर्यंत मुंबईकरांनी 'न्यू नॉर्मल' जीवनशैली आत्मसात करताना, प्राप्त परिस्थितीसोबत जगण्यास सुरुवात करावी, असं आवाहनही म्हैसकर यांनी केलंय.

Mumbai corona virus curve flattens Success bmc


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai corona virus curve flattens Success bmc