esakal | मुंबईत सलग तीन दिवस कोरोना सक्रिय रुग्ण ९० हजारांपार

बोलून बातमी शोधा

मुंबईत सलग तीन दिवस कोरोना सक्रिय रुग्ण ९० हजारांपार

लवकरच मुंबईत एक लाख सक्रिय रुग्णांचा टप्पा पार होणार आहे. दर दिवशी मुंबईत 9 ते 10 हजाराच्या दरम्यान कोरोना रुग्ण सापडत आहेत.

मुंबईत सलग तीन दिवस कोरोना सक्रिय रुग्ण ९० हजारांपार
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईसह राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून सक्रिय रुग्णांच्या वाढत्या आकड्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार वाढू लागला आहे. लवकरच मुंबईत एक लाख सक्रिय रुग्णांचा टप्पा पार होणार आहे. दर दिवशी मुंबईत 9 ते 10 हजाराच्या दरम्यान कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातच सक्रिय रुग्ण दुपटीने वाढत आहेत. सद्यस्थितीत मुंबईत 92 हजार 464 एवढे सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दर दिवशी किमान हजारांनी सक्रिय रुग्ण वाढत आहेत. 10 एप्रिल या दिवशी मुंबईत 91,108 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 11 एप्रिलला ही संख्या 1,356 ने वाढून 92 हजार 464 एवढ्यावर पोहोचली. तर, 9 एप्रिलला 90 हजार 333 सक्रिय रुग्ण होते.

तीन दिवसांत हजारांनी सक्रिय रुग्णांमध्ये वाढ

9 एप्रिल - 90 हजार 333
10 एप्रिल - 91 हजार 108
11 एप्रिल - 92 हजार 464

8 एप्रिल या दिवशी 86 हजार 279 एवढे सक्रिय रुग्ण होते. म्हणजेच 9 एप्रिल या एका दिवशी सक्रिय रुग्णांमध्ये 4 हजार 054 रुग्णांची भर पडली आणि ही संख्या 90 हजार 333 वर पोहोचली.  7 एप्रिलला ही मुंबईतील सक्रिय रुग्णांमध्ये 4,391 रुग्णांची भर पडली आणि ही संख्या 81,886 वरुन  86, 279 एवढ्यावर पोहोचली. त्यामुळे, सरासरी कोरोना सक्रिय रुग्णांमध्ये फक्त 5 दिवसांत 10 हजारांहून अधिक सक्रिय रुग्णांची भर पडली आहे.
  
राज्यात 5 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण

सध्या राज्यात 5 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण असून महाराष्ट्र अजूनही देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे. देशभरातील कोरोनाचे 57 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गेल्या आठवड्यांपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. विकेंड लॉकडाऊनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, तरीही राज्यात रविवारी 63 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे वैद्यकीय आरोग्य तज्ञांनीही वाढत्या रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा- मुंबईतल्या कोरोनाच्या गंभीर स्थितीवर महापौरांनी दिली महत्त्वाची बातमी

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून सध्या 1, 09,590 एवढी ही संख्या आहे. त्यापाठोपाठ मुंबईत  92 हजार 464 , ठाण्यात 74,335, नागपूरमध्ये 58,507 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर असून लोकांनी आताच काळजी घेतली नाही तर ही परिस्थिती आणखी बिकट होईल अशी भीती टास्क फोर्सने व्यक्त केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
कम्युनिटी स्प्रेडमुळे वाढती संख्या

आता जी वाढलेली संख्या आहे ती कम्युनिटी स्प्रेडमुळे आहे. म्हणजेच दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 30 ते 40 हजारांच्या घरात सक्रिय रुग्ण होते. पण, आता 15 एप्रिलपर्यंत जी संख्या 80 किंवा 85 हजार एवढी हवी होती ती काही दिवसांनी 1 लाखांचा टप्पा गाठेल. त्यानुसार, हा संसर्ग आता कम्युनिटीमध्ये पसरला आहे.

लॉकडाऊन सदृश्य नियमांची गरज

सरकारने अजून या बाबतीत दुजोरा दिला नसला तरी लॉकडाऊन सदृश नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 1 कोटी 40 लाखांमध्ये फक्त 5 लाखांमध्ये हर्ड इम्युनिटी जरी तयार झाली असेल तरी पुन्हा संसर्ग होण्याचे, स्थलांतरीत होण्याचे, नवा स्ट्रेन (व्हायरसचे बदललेले रुप) ही कारणे देखील महत्त्वाची आहेत. त्यामुळे, जर पूर्वी एखाद्याला संसर्ग होऊन हर्ड इम्युनिटी तयार झाली असेल त्यांनाही पुन्हा संसर्ग होऊ शकतो. सक्रिय रुग्ण वाढत आहेत त्यामुळे, आणखी कडक निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येईल, ऑक्सिजन संपेल, आयसीयू, बेड्स आणि यातून मृत्यूदर वाढेल अशी परिस्थिती होईल अशी भीती कोडिव टास्क फोर्स सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली.
  
आर्थिक चक्रासह निर्बंध पाळणे आवश्यक

आर्थिक चक्रासह निर्बंध पाळणे आवश्यक आहे. तरच परिस्थिती हाताळणे शक्य आहे. जिथे जमाव आहे, म्हणजेच पार्टी, लग्न समारंभ असे सर्व कार्यक्रम बंद झालेच पाहिजे. गर्दी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे असेही डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona Virus stage of one lakh active patients will be crossed