मुंबईत सप्टेंबर महिना ठरतोय रुग्णवाढीचा महिना, धोका वाढतोय

पूजा विचारे
Monday, 7 September 2020

मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पालिकेनं आजपर्यंत बरेच अथक प्रयत्न केले. मात्र गणेशोत्सवाच्या काळात भेटीगाठींमध्ये वाढ झाल्यानं कोरोनाचे रुग्ण आता वाढत चालले आहे.

मुंबईः  रविवारी मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांचा भडका उडला आहे. रविवारी १,९१० नवे रुग्ण आढळून आले.  मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १,५५,६२२ झाली आहे. मुंबईत रविवारी ३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ७,८६६ वर पोहोचला आहे. तर ९११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दरही खाली घसरला असून तो ७९ टक्के इतका झाला आहे. 

मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पालिकेनं आजपर्यंत बरेच अथक प्रयत्न केले. मात्र गणेशोत्सवाच्या काळात भेटीगाठींमध्ये वाढ झाल्यानं कोरोनाचे रुग्ण आता वाढत चालले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत रुग्णवाढीचा वेग कायम राहण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे. २७ ऑगस्टपासून एक हजार नोंदवलेल्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. 

गेल्या काही दिवसांत दीड ते दोन हजारांपर्यंत रुग्ण संख्या वाढू लागली आहे. याआधी हीच संख्या हजार ते १२०० पर्यंत वाढत होती. रोजची वाढती संख्या पाहून पालिकेची डोकेदुखी पुन्हा वाढू लागली आहे. 

हेही वाचाः  Mumbai Rain: मुंबईकर सुखावले! मुंबई ठाण्यात पावसाची हजेरी

येत्या काळात मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी पालिकेच्या पातळीवर सर्व खबरदारी घेतली जातेय. आत्तापर्यंत दररोज सहा हजार कोरोना चाचण्या होत होत्या, ती संख्या आता दहा हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जास्त रुग्ण आढळून तातडीने उपाययोजना करता येईल. रुग्ण वाढले तरी पालिकेची यंत्रणा सक्षम असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश यांनी दिली.

अधिक वाचाः सुशांतसिंह चौकशी प्रकरण: रिया चक्रवर्तीच्या खाजगी स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईत कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकार आणि पालिकेने नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. या शिथिलतेने गणेशोत्सवात कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेतली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गणेशोत्सवा दरम्यान कोरोनाबाधितांशी जवळच्या नागरिकांशी संपर्क आल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेनं प्रयत्न सुरू केले असल्याची काकाणी यांनी दिली.

२३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंतची रुग्णवाढ

 • २३ ऑगस्ट : ९३१
 • २४ ऑगस्ट : ७४३
 • २५ ऑगस्ट : ५८७
 • २७ ऑगस्ट : १,३५०
 • २८ ऑगस्ट : १,२१७
 • २९ ऑगस्ट : १,४३२
 • ३० ऑगस्ट : १,२३७
 • ३१ ऑगस्ट : १,१७९
 • १ सप्टेंबर : १,१४२
 • २ ऑगस्ट : १,६२२
 • ३ ऑगस्ट : १,५२६
 • ४ सप्टेंबर : १,९२०
 • ५ सप्टेंबर : १,७३५
 • ६ सप्टेंबर : १,९१०

मुंबईत ५६८ इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ७,०९९ असून गेल्या २४ तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले ७,३११ अति जोखमीचे रुग्ण आहेत तर २,३६२ रुग्ण कोविड केअर सेंटर १ मध्ये उपचार घेताहेत.

Mumbai coronavirus patients increased september month as compare august


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai coronavirus patients increased september month as compare august