आधी बायकोला प्रेमानं शेवटचं 'Hug', मग दिलं लोकलमधून ढकलून

पूजा विचारे
Thursday, 14 January 2021

धावत्या लोकल ट्रेनमधून पतीनं आपल्या पत्नीला ढकलून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मुंबईः  धावत्या लोकल ट्रेनमधून पतीनं आपल्या पत्नीला ढकलून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. लोकलच्या हार्बर मार्गावरील चेंबूर आणि गोवंडी रेल्वे स्टेशनदरम्यान हा प्रकार घडला आहे. एका सहप्रवाशी महिलेनं हा सर्व प्रकार पाहिल्यानं हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे. संबंधित महिलेनं या घटनेची माहिती मानखुर्द पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. 

अन्वर अली शेख असं आरोपी पतीचं नाव आहे. दुर्देवी गोष्ट म्हणजे दीड महिन्यांपूर्वी अन्वर याचं पूनम चव्हाण या महिलेसोबत लग्न झालं होतं. पूनमचं हे दुसरं लग्न होतं. पूनमला तिच्या पहिल्या पतीपासून तीन वर्षांची मुलगी देखील आहे. पूनमनं दुसरं लग्न केल्यानंतर दोघंही मानखुर्दमध्ये एका चाळीत राहत होते. हे दोघंही बेरोजगार होते. दोघेही ११ जानेवारीला दुपारी तीनच्या सुमारास लोकलनं प्रवास करत होते. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मस्जिद बंदरवरुन आपल्या नातेवाईकांना भेटून पुन्हा मानखुर्दला लोकल ट्रेनमधून येत असताना अन्वरनं पूनमला आधी मिठी मारली आणि नंतर चेंबूर स्थानक सोडल्यावर भरधाव लोकलमधून तिला रुळावर ढकलून दिलं. त्यातच पूनमचा दुर्देवी मृत्यू झाला. 

हा संपूर्ण प्रकार ट्रेनमध्ये बसलेल्या संगीता भालेराव या महिलेनं पाहिला. त्यानंतर संगीता यांनी तात्काळ घडलेला सर्व प्रकार गोवंडी रेल्वे स्थानकात असलेल्या पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकातच अन्वरला अटक केली. तर पूनमचा मृतदेह चेंबूर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर आढळून आला. 

हेही वाचा- लोकल प्रवासासाठी सामान्य नागरिक अजूनही वेटिंग लिस्टमध्ये

या प्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अनवरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.  मात्र अन्वरनं पूनमची हत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

mumbai crime Newly married man pushed wife local train accused arrest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai crime Newly married man pushed wife local train accused arrest