लोकल प्रवासासाठी सामान्य नागरिक अजूनही वेटिंग लिस्टमध्ये

पूजा विचारे
Thursday, 14 January 2021

सामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. वेळेच्या कारणामुळे या प्रकरणाची सुनावणी बुधवारी होऊ शकली नाही आहे.

मुंबईः  मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन सामान्य प्रवाशांसाठी कधी सुरु होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र अजूनही सामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करण्यावर बुधवारी राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र वेळेच्या कारणामुळे या प्रकरणाची सुनावणी बुधवारी होऊ शकली नाही आहे. यामुळेच सामान्य प्रवाशांसाठीचा रेल्वे प्रवासावरील निर्णय गुलदस्त्यातच राहिला. 

गेल्या आठवड्यात   मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर येत असल्यानं सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु करणार अशी विचारणा केली होती. यावर १२ जानेवारीपर्यंत त्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले होते. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

न्यायालयात भूमिका स्पष्ट करण्याआधी राज्य सरकार स्वतः मंगळवारी त्याबाबतचा निर्णय जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र राज्य सरकारनं मंगळवारी निर्णय जाहीर केला नाही. म्हणून काल होणाऱ्या सुनावणीच्या वेळी सरकार काय भूमिका मांडेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते. मात्र वेळेअभावी प्रकरण सुनावणीसाठी आलेच नाही. त्यामुळे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी लोकल प्रवास लांबणीवर पडला आहे.

हेही वाचा- माटुंगा कार्यशाळेतील 100 वा एलएचबी कोच प्रवाशांच्या सेवेत

दरम्यान लोकल सुरू करण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. या आठवड्यात मुंबई लोकल सुरू करण्यावर निर्णय होईल, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

Mumbai Local Train Update State government decision pending bombay high court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Local Train Update State government decision pending bombay high court