एनी डेस्क (Any Desk) ऍप किंवा सॉफ्टवेअर वापरताय? सावधान ! नवी मुंबईत काय घडलंय वाचा

टीम ई सकाळ
Thursday, 18 February 2021

सध्या बँकिंग संस्थांच्या अधिकृत वेबसाईट सारख्या हुबेहूब वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार सायबर गुन्हेगारांमार्फत केले जातात.

पनवेल : फोन पेच्या कस्टमर केअरचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगुन एका सायबर चोरटयाने कामोठे भागात राहाणाऱया एका महिलेला आपल्या मोबाईल फोनवर एनी डेस्क हे ऍप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे महिलेच्या बँक खात्यातुन तब्बल 1 लाख 9 हजाराची रक्कम परस्पर काढुन घेतल्याचा प्रकार उघडकिस झाला आहे.

या सायबर चोरटया विरोधात कामोठे पोलिसांनी फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. 

या प्रकरणात फसवणुक झालेल्या महिलेचे नाव मंदाकिनी केदार असे असून त्या कामोठे येथे राहाण्यास आहेत. मंदाकिनी यांनी मागील 30 जानेवारी रोजी त्यांच्या भावाच्या ओळखीतील गौतमलाल प्रजापती यांना 50 हजार रुपयांची रक्कम फोन पे द्वारे पाठविली होते. मात्र सदर रक्कम त्यांना मिळाली नसल्याचे गौतमलाल यांनी सांगितल्यानंतर मंदाकिनी यांनी बँकेत जाऊन त्याबाबत चौकशी केली होती.

महत्त्वाची बातमी आता थेट दाखल होणार FIR; पुन्हा डोकं वर काढणारा कोरोना आणि नियंत्रणासाठीचा मेगाप्लान वाचा

मात्र बँकेकडून त्यांना फोन पेच्या कस्टमर केअरमध्ये संपर्क साधण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मंदाकिनी यांनी गुगलवरुन मिळालेल्या फोन पेच्या कस्टमर केअरच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला होता. 

यावेळी समोरील व्यक्तीने तो फोन पेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांचे पैसे त्यांना तत्काळ परत मिळतील असे सांगितले. त्यासाठी सदर सायबर चोरटयाने मंदाकिनी यांना त्यांच्या मोबाईलवर एनी डेस्क हे ऍप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर सदर चोरट्याने त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवून त्यांच्या दोन्ही बँक खात्याची माहिती मिळवून त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून 1 लाख 9 हजाराची रक्कम दुसऱ्या बँकेत वळती करुन त्यांची फसवणुक केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कामोठे पोलिसांनी या प्रकरणात सायबर चोरटयावर फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

महत्त्वाची बातमी :  बायकोची तंबाखूची सवय नवऱ्याला पटत नसेल तर घटस्फोट मिळतो का ? उच्च न्यायालयाने दिला निकाल

तुमच्या सोबतही असा प्रकार घडला असेल तर सावधान राहा. सध्या बँकिंग संस्थांच्या अधिकृत वेबसाईट सारख्या हुबेहूब वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार सायबर गुन्हेगारांमार्फत केले जातात. ज्याला तांत्रिक भाषेत फिशिंग असं देखील बोललं जातं. त्यामुळे तुम्ही ज्या वेबसाईट्सवर भेट देत आहेत किंवा ज्या कस्टमर केअरवर संपर्क साधत आहेत ते खरे आहेत की नाही याची पडताळणी करूनच पुढील कार्यवाही करा.  

mumbai cyber crime news lady duped for more tahn one lac rupees by saying download any desk app
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai cyber crime news lady duped for more than one lac rupees by saying download any desk app