esakal | Mumbai : स्थानिक स्तरावर ‘आघाडी’त बेबनाव?
sakal

बोलून बातमी शोधा

 महाविकास आघाडी

Mumbai : स्थानिक स्तरावर ‘आघाडी’त बेबनाव?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकोपा असला तरी स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार-खासदार, पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्यात फारसे आलबेल नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बुधवारी दिसून आले.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी’च्या आमदार व पराभूत उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक आज बोलावली होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित या बैठकीला पक्षाचे मंत्री आणि खासदारही उपस्थित होते. यात अनेकांकडून नाराजीचा सूर उमटला. साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत सुमारे ५५ जणांनी मते मांडली. विद्यमान आमदारांसह पराभूत उमेदवारांनी सरकार आणि पक्ष यांच्यात स्थानिक पातळीवर फारसे समाधानकारक चित्र नसल्याची खंत व्यक्त केली. ज्या ठिकाणी पालकमंत्री काँग्रेस अथवा शिवसेनेचे आहेत तिथे ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांना सापत्न वागणूक मिळते. मंत्रालयात या दोन्ही पक्षाचे मंत्री देखील पक्षप्रतिनिधी आणि आमदारांची कामे करताना कुचराई करतात, अशी व्यथा काहींनी मांडली.

शरद पवार म्हणाले की तीन पक्षांचे सरकार असल्याने असे मतभेद होत असतील. एका पक्षाचे सरकार असले तर पदाधिकाऱ्यांत स्पर्धा असतेच. त्यामुळे अशी नाराजी न ठेवता जनहिताचे कार्यक्रम राबवणे महत्त्वाचे आहे. काही प्रश्न केंद्राच्या धोरणामुळे निर्माण झाले आहेत. अशा समस्यांवर पक्षाने जनतेत जाऊन भूमिका मांडायला हवी.

हेही वाचा: अंबरनाथ मध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी;पाहा व्हिडिओ

‘ओबीसीं’च्या जागेवर ‘ओबीसी’च उमेदवार

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने निर्बंध आले असले, तरी ओबीसींच्या जागेवर ओबीसी उमेदवार देण्यात येईल. ओबीसी आरक्षणावर जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर निवडणुका रोखता येणार नाहीत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

कामे होत नाहीत, पालकमंत्री नीट वागत नाहीत म्हणजे काय हे सरकारमधील मंत्री सांगू शकतील. याबाबत मंत्र्यांनीच बोलणे योग्य ठरेल.

- संजय राऊत, शिवसेनेचे खासदार

loading image
go to top