Mumbai डोंबिवलीत बुलेटच्या धडकेत आजोबा नातू जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Truck accident news

Mumbai : डोंबिवलीत बुलेटच्या धडकेत आजोबा नातू जखमी

डोंबिवली : दुचाकीवरुन प्रवास करणारे आजोबा नातू बुलेटच्या धडकेत जखमी झाल्याची घटना डोंबिवलीतील 90 फिट रोडवर घडली आहे. पांडुरंग निकम (वय 56) व त्यांचा नातू दुचाकीवरुन प्रवास करत असताना एका बुलेटस्वाराने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यानंतर निकम यांना मदत न करता बुलेटस्वाराने तेथून पळ काढला. रस्त्याने जाणारे एक रिक्षाचालक व रोहीत शर्मा यांनी जखमी आजोबा, नातूस दवाउपचारासाठी डॉक्टरकडे नेले. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात बुलेटस्वारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेत तिसगांव येथे राहणारे पांडुरंग निकम हे गुरुवारी रात्री 8.30 च्या दरम्यान ठाकुर्लीतील 90 फिट रोडने आपल्या नातवासह दुचाकीवरुन कल्याण दिशेने निघाले होते. सर्वोदय मंगल इमारतीसमोर त्यांची दुचाकी आली असता रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बुलेट स्वाराने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोरात ठोकर मारली. या धडकेत पांडूरंग व त्यांचा नातू गाडीसह रस्त्यावर पडून जखमी झाले. बुलेटस्वाराने पांडूरंग यांना मदत न करता तेथून पळ काढला.

रस्त्याने जाणारा एक रिक्षा चालक व पादचारी रोहीत शर्मा हे तेथून जात असताना त्यांनी जखमी पांडूरंग व त्यांच्या नातूस मदत करत दवाउपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन गेले. पांडूरंग यांच्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटिव्ही तपासत पोलिसांनी बुलेटस्वाराचा शोध सुरु केला आहे.

डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून बुलेटस्वार, बाईक रायडर यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरुन भरधाव वेगाने दुचाकी चालवून, कर्णकर्कश हॉर्नचा आवाज करत हे दुचाकीस्वार रस्त्याने फेऱ्या मारतात. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभागही मोठा आहे.

पूर्वेतील सावरकर रोड, टिळक रोड, फडके रोड, दत्तनगर येथील डिएनसी रोड, पश्चिमेतील दिनदयाळ रोड, गणेश नगर, 90 फिट, रेल्वे समांतर रस्ता आदि भागात या बाईक रायडर आपल्या करामती करत असतात. गाडीवर नियंत्रण न राहील्याने अशा प्रकारे अपघात घडतात.

मध्यंतरी कल्याण डोंबिवली वाहतूक विभागाकडून बुलेट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. ही मोहीम सध्या थंडावली असून पुन्हा अशी मोहीम राबवून, बाईक रायडर, बुलेट स्वार यांना आळा बसवावा अशी मागणी होत आहे.