Warli painting : डोंबिवलीतील वंदेमातरम् उद्यानात साकारली वारली चित्रकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varli painting

Warli Painting : डोंबिवलीतील वंदेमातरम् उद्यानात साकारली वारली चित्रकला

डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर मधील वंदेमातरम् उद्यानात खडकावर लक्षवेधी वारली पेंटिंग चित्रकला साकारण्यात आली आहे. एमआयडीसी निवासी भागातील ज्येष्ठ नागरिक विणा देशमुख (वय 67) यांनी हे वारली चित्र साकारले आहे. बॅंकेतून निवृत्त झाल्यानंतर मोकळ्या वेळेत वारली चित्रकला त्यांनी आत्मसात केली.

निवासी भागातील वंदे मातरत हे उद्यान स्वच्छ, सुंदर ठेवण्यात आले आहे. याची सुंदरता आणखी वाढविण्यासाठी वीणा यांना येथील मोठ्या खडकांवर वारली चित्रकला साकरण्याची कल्पना सुचली. नुकतेच त्यांनी ही वारली पेंटिंग उद्यानातील खडकांवर साकारली असून उद्यानाचे सौंदर्य यामुळे आणखी खुलले आहे.

वीणा या पंजाब नॅशनल बॅंकेत नोकरी करत होत्या. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर हातात वेळ असल्याने त्यांनी वारली चित्रकला शिकत आपला छंद जोपासण्यास सुरुवात केली. वंदेमातरम उद्यानात काही मोठे खडक असून या खडकांवर वारली चित्रकला साकारुन उद्यानाचे सौंदर्य खुलविण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन कडे त्यांनी तशी परवानगी घेतली. परवानगी मिळताच गेल्या चार दिवसांपासून रोज सकाळी दोन तास येऊन स्व:खर्चाने खडकावर रंगकाम करून वारली चित्रकला काढली आहे. माघी गणेश जयंतीच्या दिवशी वारली, आदिवासी गावातील पद्धतीचे एक गणेश मंदिराचे चित्र खडकावर साकारून त्यांनी गणेश जयंती एक प्रकारे साजरी केली. याच उद्यानात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी झेंडावंदन कार्यक्रम करण्यात येतो.

त्यानिमित्त आपल्या भारतीय संस्कृतीचे वारली चित्रकलेचे दर्शन सर्वांना मिळणार आहे.सदर वंदेमातरम् उद्यान हे मिलापनगर मधील सर्व्हिस रोडच्या बाजूला हाय टेन्शन वायरच्या खाली एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर वसले असून त्यात फार पूर्वीपासून मोठे खडक, झाडी झुडपे होती. हे मोठे काळे खडक या हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या उद्यानात काहीसे दिसायला वेगळे वाटत होते.

आता त्यावर वारली पेंटिंग केल्याने या उद्यानाला एक मोहक रूप प्राप्त झाले आहे.वीणा देशमुख या उद्यानात वारली चित्रकला काढत असल्याचे पाहून उद्यानात सकाळी फिरण्यास येणाऱ्या रेखा तांबट, रुपाली प्रभूदेसाई, वर्षा महाडिक, अश्विनी तळवेलकर यांनीही त्यांना मदत केली.