"पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने केंद्र सरकारच्या तीनही शेतकरी कायद्यांचा विरोध करणार" - अजित नवले

सुमित बागुल
Monday, 25 January 2021

"केंद्राने केलेले तीनही कायदे कॉर्पोरेट धार्जिणे आहेत. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची बात केली जात असताना स्वातंत्र्य मात्र कॉर्पोरेट कंपन्यांना  मिळतंय."

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी आजच्या मुंबईतील शेतकरी मोर्चाविषयी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना डॉक्टर अजित नवले यांनी शेतकरी मोर्चाबाबत इत्यंभूत माहिती दिली. 

मुंबईत हजारोंच्या संख्येने शेतकरी दाखल होत होते. आजही काही शेतकरी मुंबईत दाखल होणार आहेत. काल जो गाड्यांचा जथ्था मुंबईत आला. त्यामाध्यमातून तब्बल १५ हजार शेतकरी मुंबईत दाखल झालेत. यासोबतच १०१ इतर संघटनांचे प्रतिनिधी या शेतकरी मार्चमध्ये सहभागी झाली आहेत. आज साधारण ५० हजार शेतकरी मुंबईत जमणार आहेत. त्यानंतर एक सभा घेण्यात येईल, सभेनंतर शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा हा राजभवनाच्या दिशेने कूच करणार आहे. महाविकास आघाडीतील तीनही राजकीय पक्ष या शेतकरी मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. तीनही पक्षांच्या नेत्यांसोबत आम्ही राजभवनामध्ये जाणार आहोत. पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने केंद्र सरकारच्या तीनही कायद्यांचा विरोध आणि हमीभाव कायद्याचा आग्रह लावून धरणार आहोत, असं डॉक्टर अजित नवले म्हणालेत. 

Farmers March : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत 'मार्च', जाणून घ्या महत्त्वाच्या मागण्या

राज्य सरकार विरुद्ध केंद्र असं चित्र निर्माण होणार का ? 

राज्य सरकारचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी होणार आहेत. या आधीही भारत बंदमध्ये तीनही पक्ष सहभागी झाले होते. त्याचबरोबर केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांचा तीनही पक्षांनी विरोध केलेला आहे. आम्ही ज्यावेळी सरकारला निमंत्रण देण्यास गेलो, तेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचं मान्य केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येण्याचं मान्य केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला, सोबतच शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या मोर्चाला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून भाजप विरद्ध जनता अशी एकजूट महाराष्ट्रात आणि देशात आकाराला येतेय. शेतकऱ्यांच्या बाजूने समाज आणि श्रमिक एकत्रित येतायत ही दिलासादायक बाब आहे, असंही अजित नवले म्हणालेत.

महत्त्वाची बातमी : मुख्यमंत्र्यांचा शेरा बदलणाऱ्याविरोधात गुन्हा; सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकार 

अजित नवलेंनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या मागण्या काय ? 

  • केंद्राने केलेले तीनही कायदे कॉर्पोरेट धार्जिणे आहेत. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची बात केली जात असताना स्वातंत्र्य मात्र कॉर्पोरेट कंपन्यांना मिळतंय. 
  • शेतमालाची बाजापेठ ताब्यात घेण्याचा केंद्राचा कावा आहे. केंद्राचा कावा उधळून लावण्यासाठी शेतकरी कायदे स्थगित करण्याची आमची मागणी 
  • आधारभावाची हमी कायदेशीररित्या मिळायला हवी 
  • महाराष्ट्रात वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी केली जावी, देवस्थाने आणि इनाम वर्ग तीनच्या जमिनी शेतकरी कसतायत, त्याही नावावर करण्याची आमची मागणी आहे.
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेची पुन्हा महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

mumbai farmers march interview of doctor ajit navale before presenting demands to governor of maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai farmers march interview of doctor ajit navale to oppose farmers bill of central government