esakal | मुंबई : मालवणी इमारत दुर्घटनेप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Malvani Building collapsed

मुंबई : मालवणी इमारत दुर्घटनेप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : शहरातील मालाड येथील मालवणी भागात इमारत कोसळल्याप्रकरणी दोन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालाडमध्ये निवासी इमारत कोसळली होती. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. (Mumbai FIR filed against two in Malad Malvani building collapsed case)

पोलिसांच्या माहितीनुसार, मालवणी येथील दुर्घटनेप्रकरणी रफीक सिद्दीकी आणि रमजान शेख या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरातील मालवणी परिसरात इमारत कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले. जी इमारत कोसळली, त्याच्या आसपासच्या तीन इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. कारण आसपासच्या इमारतीदेखील जुन्या आणि जर्जर अवस्थेत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

मालाड दुर्घटनेची जबाबदारी कोणाची हे सांगताना दु:ख होतंय. प्रशासनानं जबाबदारीनं आपली कामं नीट केली असती तर ही वेळ आली नसती. ज्यांचा जीव गेला त्यात पाच वर्षांच्या लहान मुलाचाही समावेश आहे. त्या निष्पाप लोकांची काहीच चूक नव्हती पण त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. सी-कॅटेगरीमधील म्हणजेच धोकादायक इमारतीची घोषणा झाल्यानंतर नागरिकांना तातडीने हलवायला हवं. या पुढे अशा घटनांना डोळसपणे पाहणं गरजेचं आहे, असं या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं.