esakal | कोरोनाबाधितांच्या बेड्सबाबत BMC चा महत्त्वाचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Mumbai corona Virus Updates
कोरोनाबाधितांच्या बेड्सबाबत BMC चा महत्त्वाचा निर्णय
sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविड बाधितांसाठी बेड्सचे नियोजन करण्यासाठी आता महानगर पालिकेच्या पथकामार्फत तपासणी करुनच निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात दहा पथके तयार करण्यात येणार असून प्रत्येक पथकाला रुग्णवाहीकाही देण्यात येणार आहे. रविवार पासून या नियमांची अमंलबजावणी सुरु होणार आहे.

कोविड रुग्णांच्या बेड्ससाठी वेटींग सुरु झाली आहे. अशात नियंत्रणात आलेला मृत्यूदर बेड्स न मिळाल्याने वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोविड बाधितांचा अहवाल आल्यानंतर त्याची तपासणी करुनच संबंधिताला कोणत्या प्रकारच्या बेडची आवश्‍यकता आहे हे ठरावावे असे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: आदेश बांदेकर ते भरत जाधव.. मराठी कलाकारांनी घेतला लशीचा पहिला डोस

आयुक्तांनी आज पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्या समवेत बैठक घेऊन हे आदेश दिले आहेत. प्रत्येक प्रभागात यासाठी दहा पथके नियुक्त करण्यात यावीत प्रत्येक पथकाला स्वतंत्र रुग्णवाहीका उपलब्ध करुन द्यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.अपवादात्मक परिस्थितीत या टिमने शिफारस केलेल्या प्रकारचा बेड्स उपलब्ध नसल्यास त्यांची प्रतिक्षा यादीही तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार रुग्णांना प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा: 'सत्य खाडकन् थोडाबीत मारल्यासारखं समोर आलं'; फुलवा खामकर भावूक

बेड्स मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यासाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे. रविवार पासून या नियमावली नुसार प्रभागातील वॉर रुमच्या समन्वयांतून बेड्सचे वितरण केले जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

रात्री जम्बो कोविड केंद्रात तपासणी

हे पथक सकाळी 7 ते रात्री 11 या कालावधीत काम करणार आहे.तर,या काळाव्यतिरीक्त रुग्णाची वैद्यकिय तपासणी तातडीने करणे गरजेचे असल्यास तशी तपासणी जम्बो कोविड केंद्रात करता येणार आहे. मात्र, त्याचे समन्वयही प्रभागाच्या वॉर रुम मार्फत केले जाणार आहे.

हेल्पलाईन व्यस्त राहाणार नाही

वॉर रुम मधील हेल्पलाईन क्रमांक अनेक वेळा व्यस्त असल्याचे अनुभवही नागरीकांना येत आहे. त्यामुळे आता महानगर टेलिफोन निगमशी बोलून तत्काळ 30 हंटिंग लाईनची सुविधा उपलब्ध करुन घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे हेल्पलाईन क्रमांक व्यस्त होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.