मुंबई गणेशोत्सवः गिरगावनंतर 'या' चौपाटीवरही भाविकांना प्रवेश बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई गणेशोत्सवः गिरगावनंतर 'या' चौपाटीवरही भाविकांना प्रवेश बंदी

गिरगाव चौपटीपाठोपाठ मुंबईतील दादर आणि माहीमच्या चौपट्यांवरही गर्दी होऊ न यासाठी भाविकांना विसर्जनासाठी प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई गणेशोत्सवः गिरगावनंतर 'या' चौपाटीवरही भाविकांना प्रवेश बंदी

मुंबईः मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव साध्यापणानं पार पडणार आहे. त्यातच पालिकेनं गणेशोत्सवानिमित्त नियमावली ही जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार यंदा गणपती विसर्जन करण्यासाठी समुद्रात उतरण्यास मनाई आहे. या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपटीवर भाविकांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आता गिरगाव चौपटीपाठोपाठ मुंबईतील दादर आणि माहीमच्या चौपट्यांवरही गर्दी होऊ न यासाठी भाविकांना विसर्जनासाठी प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लगतच्या रस्त्यांवर लोखंडी मार्ग रोधक उभारून चौपाटीवर जाणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. 

तसंच भाविकांना घरी, सोसायटीच्या आवारात अथवा जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करता येणार आहे. समुद्रावर पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच गणेशमूर्तीचे चौपाटीवर विसर्जन करण्यात येईल. तसंच विसर्जनावेळी चौपाटीवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी घराच्या जवळ असलेल्या कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करा, अशी विनंतीही पालिकेकडून चौपाटीसाठी नोंदणी केलेल्या भाविकांना करण्यात येते आहे. 

गिरगावप्रमाणेच दादर, माहीम चौपाटीवरही दरवर्षी गणेश विसर्जनानिमित्ताने भाविकांची गर्दी होत असते. गेल्या वर्षी येथे सुमारे २० हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आलं होतं. दरवर्षी दादर आणि माहीम चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येत असले तरी यंदा मात्र भाविकांना तेथे प्रवेश मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचाः  लॉकडाऊनच्या काळात 'या' आजारात  तब्बल ७० टक्के वाढ, सविस्तर वाचा

चौपाटीवर जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी मार्गरोधक उभारण्यात येणार आहे. चौपाटीवर येणाऱ्या भाविकांना गणेशमूर्ती पालिकेच्या ताब्यात देऊन परतावे लागणार आहे. महापालिकेमार्फत गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यात येणार आहे.

गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दोन हजार गणपतींची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. दरवर्षी गणेशोत्सवात दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येनं भाविक विसर्जनासाठी येत असतात. यंदा कोरोनाचं संकट पाहता पार्श्वभूमीवर चौपटीवर गर्दी होऊ नये म्हणून पालिकेच्या डी विभाग कार्यालयाद्वारे एस. एम. जोशी क्रीडांगण, ऑगस्ट क्रांती मैदान, गिल्डर लेन वसाहत, बाणगंगा, बीआयटी चाळ मैदान (मुंबई सेंट्रल), बॉडीगार्ड लेन आरटीओ येथे कृत्रिम तलाव उभारण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.

अधिक वाचाः  मुंबईत गाडी चालवता का?, मग 'ही' बातमी खास तुमच्यासाठी

गणेश विसर्जनासाठी भाविकांनी पालिकेच्या shreeganeshvisarjan.com  या वेबसाईटवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन हजार भाविकांनी नोंदणी केली आहे. बऱ्याच भाविकांनी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन करण्यासाठी नोंदणी केल्याचं समजतंय.  पालिकेनं भाविकांना कृत्रिम तलावाच्या आसपास राहणाऱ्यांना तिथेच विसर्जन करण्याची विनंतीही केली आहे. कुलाब्यापासून लालबाग, परळ, चेंबूर परिसरांतील गणपतींचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येते.

Mumbai ganesh festival 2020 after girgaon chowpatty dadar mahim chowpatty banned no entry devotees

loading image
go to top