
Mumbai : बारावे कचरा प्रकल्पातील कचरा पुन्हा पेटला...
डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील बारावे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्यास शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. बारावे येथील घनकचरा प्रकल्पात मागीलवर्षी मार्च महिन्यात आग लागून प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या प्रकल्पातील मशिनरी अनेक महिने बंद अवस्थेत होत्या.
यावर्षी पुन्हा मार्च महिन्यात या प्रकल्पातील कचऱ्यास आग लागली असून यामध्ये मशिनरीचे काही नुकसान झाले आहे का ? ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कल्याण पश्चिमेला रिंगरोड व उल्हास नदीला लागून असलेल्या बारावे परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. याठिकाणी सुक्या कचऱ्या वर प्रक्रिया केली जाते. मागील वर्षी मार्च महिन्यात येथील प्रकल्पाला आग लागल्याने प्रकल्पाचे मोठे नुकसान होऊन चार मशिनरी जळून खाक झाल्या होत्या.
प्रकल्प बंद अवस्थेत असतानाही घंटागाड्यांतून येथे कचरा आणून टाकला जात होता. यामुळे सध्या या ठिकाणी आधारवाडी सारखा कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. पावसाळ्यात कचरा कुजल्याने परिसरात कचऱ्याची दुर्गंधी सुटून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने स्थानिक नागरिक, सामाजिक संस्थांकडून या प्रकल्पास वारंवार विरोध होताना दिसतो.
शुक्रवारी पहाटे कचरा प्रकल्पातील सुक्या कचऱ्यास आग लागली. सुका कचऱ्याने पेट घेतल्याने कचऱ्याचा धूर परिसरातील नागरी वस्तीत पसरला आहे. परिसरात धूरच धूर झाल्यानंतर कचऱ्यास आग लागल्याचे स्थानिकांना समजले.
पहाटे चारच्या सुमारास अग्निशमन दलास याची माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सुका कचरा असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली. आगीमुळे प्रकल्पातील मशिनरीचे काही नुकसान झाले आहे किंवा नाही याची अद्याप काहीही माहिती नाही. शिवाय कचऱ्यास आग असल्याने आग विझविण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल हे ही निश्चित सांगता येत नसल्याचे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले.
मागील आठवड्यात आधारवाडी डम्पिंगला तीन वेळा मोठी आग लागल्याची घटना घडली होती. ती आग लागली नसून लावली असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे आता बारावे प्रकल्पातील कचऱ्यासह आग लागण्याची घटना घडू लागली असून ही लाग लावली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काही वर्षांपूर्वी आधारवाडीला सातत्याने लागणाऱ्या आगींच्या घटना पाहता महापालिका प्रशासनाने याचा तपास करत पुराव्यांसह आधारवाडीला आग लावली जात असल्याची बाब उघड केली होती. त्याच धर्तीवर बारावे प्रकल्पाकडेही पालिका प्रशासन लक्ष देणार का ? हे पहावे लागेल.