बेस्ट भरून काढतेय रुग्णवाहिकेची कमतरता! मिनी बसचे रुग्णवाहिकेत रुपांतर

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 15 May 2020

66 रुग्णवाहिकेंच्या जोडीला 72 बेस्ट रुग्णवाहिका येत आहेत. बेस्टच्या मिनी बसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले असून त्या सोमवारपासून सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. 

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे बहुसंख्य रुग्णवाहिका त्यांच्या सेवेत आहेत, त्यामुळे मुंबईतील अन्य रुग्णांना रुग्णालयात नेण्याचा प्रश्न येत आहे. त्यामुळे आता सध्याच्या 66 रुग्णवाहिकेंच्या जोडीला 72 बेस्ट रुग्णवाहिका येत आहेत. बेस्टच्या मिनी बसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले असून त्या सोमवारपासून सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. 

नवी मुंबईची लवकरच रेडझोनमधून सुटका? बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

मिनि बसनी बेस्टच्या उत्पन्नात वाढ करताना अनेक मुंबईकरांना कमी अंतराच्या प्रवासाचा प्रश्न सोडवला होता. आता त्याच मिनी बसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले आहे. त्यापैकी दोन बसमध्ये तर ऑक्सिजन सिलेंडरसह लाईफ सपोर्ट सिस्टीमही असेल. 

मुंबईत काही दिवसांपासून रुग्णवाहिकांची चांगलीच चणचण भासत होती. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही हे मान्य केले होते. त्यातच एका कोरोना बाधित संशयीत रुग्णाला नेल्यावर त्याचे पूर्ण निर्जंतुकीकरण केले जात असे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना रुग्णालयात नेण्यास दोन ते तीन तास विलंब होत होता. गेल्या महिन्यात राज्य सरकारने अतीरिक्त रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याची सूचना मुंबई महापालिकेच्या आपत्तीनिवारण विभागास केली होती. आता त्यानुसार बेस्ट बसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले आहे. त्यासाठी या बसमध्ये स्ट्रेचरवरील रुग्णासही नेण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे.  

18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...

सोमवारपासून मुंबई महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाच्या ताफ्यात एकंदर दीडशे रुग्णवाहिका असतील. नियमीत रुग्णवाहिकांबरोबर बेस्ट बस तसेच मिनी बसचे रुपांतर केलेल्या रुग्णवाहिकाही त्यात असतील. मिनी एसीबसमध्ये शेवटच्या सीट काढून तिथे स्ट्रेचर ठेवण्यात आले आहे. ड्रायव्हरचा भाग अल्युमिनीयमच्या शीटने बंदिस्त करण्यात आला आहे. आता यामुळे मुंबई महापालिकेस नव्याने 70 सेमी रुग्णवाहिका आणि दोन पूर्णपणे सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai to get 150 ambulances monday as best pitches in with 72 mini buses