नवी मुंबईची लवकरच रेडझोनमधून सुटका? बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत जाणाऱ्या शहरात आता मृत्यूपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरात सद्यस्थितीत 910 कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी 202 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नवी मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत जाणाऱ्या शहरात आता मृत्यूपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरात सद्यस्थितीत 910 कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी 202 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनासोबत इतर आजार असल्यामुळे आत्तापर्यंत 19 रुग्ण दगावले आहेत. देशात आणि राज्यात सर्वाधिक कमी मृत्युदर असणारे नवी मुंबई शहर आहे. त्यामुळे लवकरच नवी मुंबईला रेड झोनमधून मुक्तता मिळेल, अशी शक्यता वाढली आहे.

मोठी बातमी ः 'त्याच्या'मुळे बावीस जण झाली होती क्वारंटाईन; 'तो' शरण आला आणि निगेटिव्ह सुद्धा!

मुंबई आणि ठाणे या दोन मोठ्या शहरांच्या शेजारी वसलेल्या नवी मुंबई उपनगरातही कोरोनाचा फैलाव होत आहे. मुंबई आणि ठाणे शहरांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची तीव्रता कमी असली, तरी मुंबई, पुणे आणि ठाण्याला अत्यावश्यक सेवेतील घटकांच्या ये-जा करण्यामुळेच शहरातील नागरिक कोरोनाच्या दरीत गेल्याचे उघड झाले आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याला काहीसा एपीएमसी मार्केटनेही हातभार लावला आहे. शहरात असणाऱ्या 910 रुग्णांपैकी 270 रुग्ण एकट्या एपीएमसी मार्केटने दिले आहेत. वाढते रुग्ण लक्षात घेता महापालिकेने रुग्णांच्या उपचारासाठी मोठी पावले उचलली आहेत. मात्र, रुग्णसंख्या घटण्यासोबत रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले आहे.

मोठी बातमी ः नवी मुंबईकरांना दिलासा; रुग्णवाहिकेची समस्या सुटणार

कोव्हिड-19 साठी रुग्णालये
महापालिकेतर्फे वाशीचे प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्णपणे कोव्हिड-19 रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. वाशी सेक्टर 14 मधील बहुउद्देशीय रुग्णालय, सीबीडी-बेलापूरमधील वारकरी भवन येथे विशेष कोव्हिड रुग्णालये पालिकेने सुरू केली. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तुर्भेतील आयबीएस हॉटेल, पनवेलमधील इंडिया बुल्स रहिवासी सोसायटी या खासगी ठिकाणीही कोव्हिड केअर सेंटर सुरू केले. तसेच वाशीतील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रातही एक हजार खाटांचे रुग्णालय नियोजित आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयांनाही कोरोनावरील रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना तत्काळ सुविधा मिळत असल्याने रुग्णांचा आजार बरा होण्यास मदत होत आहे. 

मोठी बातमी कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन अत्यवस्थ; पर्यटकांच्या संख्येत 80 टक्क्यांची घट?  

नवी मुंबईचा मृत्यदर सर्वाधिक कमी
सद्यस्थितीत देशातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 9 टक्के इतका असून, राज्यातील सुमारे 3.77 टक्के एवढा आहे. तर मुंबईचा 3.06 टक्क्यांच्या आसपास असून, नवी मुंबईचा मृत्यूदर 2.18 टक्के इतका सर्वाधिक कमी आहे. त्यामुळे येत्या काळात सारखीच परिस्थिती राहिल्यास नवी मुंबई रेडझोनमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

मोठी बातमी ः सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करा; कामगार संघटनेची मागणी

कोरोना रुग्णांवर एक दृष्टिक्षेप

  •  एकूण चाचणी केलेली रुग्णांची संख्या : 7653
  •  एकूण निगेटीव्ह आलेल्या रुग्णांची सख्या : 5626
  •  पॉझिटीव्हचे निगेटीव्ह झालेले रुग्ण संख्या : 255
  •  एकूण पॉझिटीव्ह रुग्ण संख्या : 974
  •  एकूण प्रलंबित तपासणी अहवाल : 1056
  •  एकूण कोरोनामुळे मृत्यु पडलेले रुग्ण : 19

मोठी बातमी ः वरळी कोळीवाड्यातल्या नागरिकांसाठी 'मोठी' आनंदाची बातमी, पालिकेनं घेतला 'हा' निर्णय

देशातील आणि राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर पाहिला तर नवी मुंबईचा तो सर्वाधिक कमी आहे. ज्याप्रमाणे कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊन बरे होणाऱ्यांच्या संख्या वाढत आहे, ही शहरासाठी समाधानाची बाब आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rate of recovered corona patinets in navi mumbai increased