मुंबई : गोखले ब्रीजच्या पर्यायी मार्गावर फेरीवाला, खड्डे बुझवण्याची मोहीम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gokhale Bridge Andheri

अंधेरीतील पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटीचा गोखले ब्रीज वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर या कामाची दखल मुख्यमंत्री कार्यालयानेही घेतली आहे.

मुंबई : गोखले ब्रीजच्या पर्यायी मार्गावर फेरीवाला, खड्डे बुझवण्याची मोहीम सुरू

मुंबई - अंधेरीतील पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटीचा गोखले ब्रीज वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर या कामाची दखल मुख्यमंत्री कार्यालयानेही घेतली आहे. याठिकाणी फेरीवाले आणि अतिक्रमण हटवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानुसारच पालिकेची यंत्रणा या भागात कामाला लागली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुझवण्यापासून ते खराब पॅचेस, फुटपाथ दुरूस्ती, फेरीवाल्यांवर कारवाई, खटारा वाहने, मार्गिका वळवल्याबाबतचे दिशा दर्शक बोर्ड, दुकानांसमोरील रॅम्प हटवणे यासारख्या कामांना अंधेरी भागात सुरूवात झाली आहे. महापालिकेच्या के पश्चिम वॉर्डच्या माध्यमातून तब्बल १२ रस्त्यांवर ही कारवाईची मोहीमे सुरू झाली आहे. तर पालिकेने काही ठिकाणी फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी पोलिसांकडेही मदत मागितली आहे.

मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत ५२ ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुझवले आहेत. अद्यापही काही ठिकाणी असलेले खड्डे लवकरच बुझवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. अनेक ठिकाणी रस्त्यांचे खराब पॅचेस आहेत. त्यापैकी २० पॅचेसच्या ठिकाणी पालिकेने कामाला सुरूवात केली आहे. यापैकी पॅचेस लवकरच बुझवण्यात येणार आहे. काही ठिकाणी मेट्रो २ बी अंतर्गत एमएमआरडीएच्या रस्त्यांवर खड्डे आहेत. यासाठीची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या केबलवरही कारवाई करण्यात आली आहे. काही भागात फुटपाथची रूंदी ही वाहतुकीच्या दृष्टीने कमी कऱण्यात आली आहे. तर नकोशा रस्त्यावर पडलेल्या वस्तु आणि दुकानांच्या समोरील रॅम्पदेखील हटवण्यात आले आहे. ज्या गोष्टींनी वाहतुकीला अडथळा येतो अशा गोष्टी हटवण्यावरही भर देण्यात आला आहे. ज्याठिकाणी रस्त्यांच्या फांद्या कापण्याची गरज आहे अशा ठिकाणीही पालिकेकडून ही कारवाई करणयात आली आहे. काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्याचे दिशादर्शक बोर्ड तसेच नो पार्किंगचे फलकही लावण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या मदतीने अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई सुरू झाली आहे.

कोणत्या रस्त्यांवर कारवाई मोहीम?

एस व्ही रोड (मिलन सबवे ते व्ही एम रोड जंक्शन) (१३०० मीटर), व्ही एम रोड ते अंबोली जंक्शन (३००० मीटर), अंबोली जंक्शन ते ओशिवरा नदी (२६०० मीटर), गुलमोहर रोड नं १ व्ही एम रोड ते जुहू सर्कल (२०८० मीटर), एस व्ही रोड जंक्शन ते मिठीबाई कॉलेज (३१० मीटर), मिठीबाई कॉलेज जंक्शन ते बीपी पटेल चौक (११०० मीटर), इरला रोड (३७० मीटर), एन एस फडके रोड (१०५० मीटर), जे पी रोड (एसव्ही रोड ते न्यू लिंक रोड (१८०० मीटर), सीजर रोड (९४० मीटर), न्यू लिंक रोड (५७०० मीटर), दादा भाई रोड (५०० मीटर)

पोलीस संरक्षणाची पालिकेची मागणी

के पश्चिम विभागातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल तांत्रिक कारणाने बंद करून वाहतूक इतर रस्त्यांवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे वळवण्यात आलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी आढळून येणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या के पश्चिम विभागाने उपायुक्त (वाहतुक) विभागाला पत्र लिहिले आहे. याठिकाणी फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी मुंबई महापालिकेने केली आहे. के पश्चिम विभागाच्या अखत्यारीतील जे पी रोड, एस व्ही रोड, गजधर रोड, अंबोली सिग्नल या डीएन नगर वाहतूक पोलीस ठाण्याअंतर्गत फेरीवाल्यांविरोधात कारवाई अपेक्षित आहे. तर रूबी हॉस्पिटल, बेहरामबाग सिग्नल, एस व्ही रोड, अजित ग्लास सिग्नल, जोगेश्वरी (पश्चिम) या ओशिवरा वाहतूक पोलीस ठाण्यातील भागाचा समावेश आहे. तर इर्ला सोसायटी रोड, व्ही एम रोड (मिठीबाई महाविद्यालय), एस व्ही रोड, विलेपार्ले (प) या सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील भागात पोलीस बंदोबस्त आणि मनुष्यबळ द्यावे अशी मागणी के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी केली आहे.