
बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालायत रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली.
Google Company : गुगल कंपनीच्या ऑफिसात घातपात करण्याची धमकी; आरोपी हैदराबादेतून अटकेत
मुंबई - बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालायत रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
बीकेसी येथील गुगल इंडियाच्या दूरध्वनीवर रविवारी दूरध्वनी आला होता. आरोपीने केलेल्या या दूरध्वनीत त्याने पुणे गुगल कंपनीच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पुणे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले.
त्यानंतर गुगलच्या वतीने दिलीप तांबे यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धमकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शिवानंदविरोधात 505(1)(ब) व 506(2) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता दूरध्वनी हैद्राबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बीकेसी पोलिसांचे एक पथक हैद्राबादला रवाना झाले. आरोपी शिवानंद याला हैदराबादेतून अटक केली.