esakal | मुंबापुरीची गगनचुंबी वाटचाल!
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

"व्हीला संस्कृती' हद्दपार; देशात 20 मजली इमारतींची सर्वाधिक बांधकामे मुंबईत 

मुंबापुरीची गगनचुंबी वाटचाल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बैठ्या चाळी, एक-दोन मजली बंगल्यांपासून सुरू झालेला मुंबईचा प्रवास टोलेजंग इमारतींपर्यंत पोहचला आहे. गगनचुंबी इमारती वाढू लागल्या आहेत. देशातील सात प्रमुख शहरांत 20 मजली इमारतींची मुंबईत सर्वाधिक बांधकामे सुरू झाली आहेत. महामुंबईत 2019 मध्ये 734 गृहनिर्माण प्रकल्प सुरू झाले असून त्यातील 550 प्रकल्प 20 मजल्यांहून अधिक इमारतींचे आहेत. इमारतींची उंची वाढताना "व्हिला संस्कृती' हद्दपार होत आहे. 

देशातील सात प्रमुख शहरांत 1816 नव्या निवासी प्रकल्पांची सुरुवात झाली. त्यातील 52 टक्के प्रकल्प बहुमजली इमारतींचे आहेत. मुंबईत उंच इमारतींची संख्या वाढत असताना लक्ष्मीपुत्रांची बंगल्याची इच्छा कमी होत आहे. गतवर्षी बंगल्याचा (व्हिला) एकही प्रकल्प सुरू झालेला नाही. यात जमिनीच्या तुटवड्यामुळे वाढलेल्या किमती हे प्रमुख कारण मानले जाते.

हेही वाचा : मुंबईचे वन्य जीवन आता रुपेरी पडद्यावर

मुंबईतील 20 मजली इमारतींत "थ्री बीएचके' घ्यायचे झाल्यास किमान चार कोटींपासून 10-12 कोटी रुपये हवेत. दक्षिण मुंबईत हा दर 20 कोटींपर्यंतही आहे; तर व्हिलाचा दर 10 कोटींच्या पुढे सुरू होतो, असे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. नवी मुंबई, ठाण्यातही बंगल्याची किंमत चारपाच कोटींहून अधिक होते. 2014 मध्ये महामुंबईतील एकूण प्रकल्पांपैकी एक टक्का प्रकल्प व्हिलाचे होते; मात्र यंदा हे प्रमाण शून्यावर आले आहे. 

मालमत्ताविषयक सल्लागार "ऍनरॉक' कंपनीच्या आकडेवारीनुसार मुंबई, बेंगळूरु, हैद्राबाद, कोलकाता, चेन्नई, एनसीआर (राष्ट्रीय राजधानी महानगर) परिसरात 1816 गृहनिर्माण प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यातील 52 टक्के प्रकल्प बहुमजली निवासी इमारतींचे आहेत; तर मुंबईतील एकूण निवासी प्रकल्पांपैकी 75 टक्के प्रकल्प 20 मजल्यांहून अधिक मजली इमारतींचे आहेत. त्याखालोखाल दिल्लीचे प्रमाण 70 टक्के आहे. दिल्लीत 89 प्रकल्प 20 मजल्यांहून अधिक इमारतींचे आहेत. हैद्राबादमध्ये 23, कोलकाता येथे 21 आणि चेन्नईत 16 टक्के इमारती 20 मजल्यांहून अधिकच्या आहेत. 

हेही वाचा : `वाडिया`चा हिशेब का नाही?

बांधकाम क्षेत्राच्या व्याख्येनुसार 23 मीटरहून अधिक उंचीच्या म्हणजेच सातहून अधिक मजले असलेली इमारत "बहुमजली' (हायराईज) इमारत मानली जाते. महामुंबईत सध्या 20 आणि त्याहून अधिक मजली इमारतींचे बांधकाम सुरू आहे. इतर शहरे या स्पर्धेत महामुंबईच्या आसपासही नाहीत. 

जगात भारत सहाव्या स्थानी
100 मीटर उंचीची 20 मजली इमारत बांधता येते; तर 150 मीटरहून अधिक उंचीची इमारत "गगनचुंबी' इमारत मानली जाते. अशा 100 हून अधिक इमारती मुंबईत आहेत. गगनचुंबी इमारतींच्या संख्येत भारत जगात सहाव्या क्रमांकावर आहे. 


मुंबईतील इमारतींचा प्रवास... 

  • 19 वे शतक संपताना बैठ्या चाळी आणि टुमदार बंगले 
  • 20 व्या शतकाच्या सुरुवातीला तीन ते चार मजली लाकडी चाळी 
  • 1920-30 मध्ये कॉंक्रीटच्या चार ते पाच मजली इमारती 
  • 1960 मध्ये ताडदेवजवळील अल्टामाऊंट मार्गावर "उषा किरण' ही पहिली 25 मजली इमारत 
  •  याच कालावधीत उपनगरांचा विकास. म्हाडा अर्थात, तेव्हाच्या "हाऊस बोर्डा'मार्फत दोन ते चार मजली कॉंक्रीटच्या चाळींचे बांधकाम सुरू 
  •  उपनगरात "ओनरशिप फ्लॅट' संस्कृती रुजली. या इमारतीही तीन ते पाच मजली होत्या. मूळ मुंबईतील चाळींतील घरे पागडी किंवा भाडेपद्धतीच्या होत्या 
     
loading image