मुंबईकरांची प्रवासकोंडी; एक्‍स्प्रेस वेवर पाच किलोमीटरच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

मुंबई : आजपासून सलग चार दिवस सुट्ट्या मिळाल्याने मुंबईकरांनी पर्यटनासाठी शुक्रवारी (ता. 27) रात्रीपासूनच शहराबाहेर जाण्यास सुरुवात केल्याने मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या दोन्ही महामार्गांवर वाहनांच्या तब्बल पाच किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्यामुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

शनिवार, रविवार, बुद्धपौर्णिमा आणि महाराष्ट्र दिन अशा चार दिवस सुट्ट्या आल्या आहेत. त्यातच लहान मुलांनाही सध्या उन्ह्याळ्याची सुट्टी असल्यामुळे मुंबईकरांनी पर्यटनाचे नियोजन केले आहे. यात महाबळेश्‍वर, माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा अनेकांनी बेत केला आहे. यासाठी अनेक मुंबईकर खासगी तसेच सार्वजनिक वाहनाने घराबाहेर पडले; मात्र एकाच वेळी अधिक वाहने बाहेर पडल्याने महामार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे प्रवाशांना 10 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तासापेक्षा अधिक वेळ लागत होता. 

वाढत्या उकाड्याने हैराण झाल्यामुळे काही दिवस दिलासा म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे ठरवले होते. यात महाबळेश्‍वर, माथेरान यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणांसह अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा बेत आखला होता; मात्र महामार्गावर वाहतुकीच्या प्रचंड रांगा लागल्याने पहिला दिवस प्रवासात गेल्याचे एका प्रवाशाने सांगितले. 
मुंबईचे तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यामुळे मुंबईत उकाडा खूप आहे. सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने महाबळेश्‍वरच्या थंड हवेत पर्यटनाचे नियोजन केल्याचे पर्यटक चेतन शिंदे यांनी सांगितले. 

सुट्ट्यांमुळे नागरिक थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास जास्त पसंती दाखवत आहेत. थोडी सुट्टी वाढवून उत्तर भारतात जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही अधिक आहे. तसेच जवळचे पर्यटनाचे ठिकाण म्हणून महाबळेश्‍वर व गोव्याला अधिक पसंती दिली जात आहे. 
- पंकज गिरासे, पंकज टुर्स अँड ट्रॅव्हल्स

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai heads out of the city for long weekend