esakal | बाळाला स्तनपान न करणे मातेसाठी धोकादायक; ३५ वर्षीय महिलाही विळख्यात | Breast Cancer
sakal

बोलून बातमी शोधा

Breast Cancer

बाळाला स्तनपान न करणे मातेसाठी धोकादायक; ३५ वर्षीय महिलाही विळख्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत (Mumbai) स्तनाच्या कर्करोगाचे (Breast cancer) प्रमाण वाढत असून तरुणीही या आजाराच्या कचाट्यात येत आहेत. त्यामागील मुख्य कारण म्हणजे (lifestyle) जीवनशैलीतील बदल. विशेषत: बाळांना स्तनपान (breast feeding) न करणाऱ्या मातांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: राज्यभरात अॅक्युपंक्चरसाठी पात्रता परीक्षा सुरळीत

दरवर्षी ऑक्टोबर महिना हा ‘स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता महिना’ म्हणून साजरा केला जातो. स्तनाच्या कर्करोगाचे कारण, प्रतिबंध, निदान, उपचाराबद्दल जनजागृती करणे, हे त्यामागील उद्दिष्ट आहे. दरम्यान, महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. याबाबत टाटा रुग्णालयाच्या प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी विभागाच्या डॉ. गौरवी मिश्रा म्हणाल्या की, इतर कर्करोगाच्या तुलनेत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. १९९२ ते २०२० पर्यंत मुंबईत या आजाराच्या रुग्णांमध्ये ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे. या आजाराचे निदान करण्यासाठी संशोधन केले जात आहेत. ‘ब्रेस्ट पॅल्पेशन मेडिकल टेस्ट’ ही चाचणी स्तनाचा कर्करोग शोधण्यात प्रभावी ठरली आहे.

नेमकं कारण काय?

गेल्या दीड वर्षात स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दररोज तीन ते चार प्रकरणे दिसत आहेत. पूर्वी ५५ ते ६० वर्षांवरील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आढळत होता. आता ऐन पस्तीशीतील महिलांनाही स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे सध्या मुलींचे २८ ते ३० वर्षात लग्न होते. शिवाय लग्नानंतर करिअर आणि कुटुंब नियोजनामुळे अनेक महिला उशिरा मुलांना जन्म देतात. एवढेच नव्हे, तर नोकरदार महिला बाळांना स्तनपानही करत नाहीत. किमान सहा महिन्यांपर्यंत बाळांना स्तनपान केले पाहिजे; परंतु आजकाल अडीच महिन्यांपर्यंतच स्तनपान करण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

पुरुषांमध्येही स्तनाचा कर्करोग

सध्या महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्येही स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण दिसत आहेत. १०० कर्करोगाच्या रुग्णांमध्ये एका पुरुषास स्तनाचा कर्करोग असतो. कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनिल हिरूर म्हणाले की, हा आजार दुर्मिळ असला तरी पुरुषांनाही होऊ शकतो. आकडेवारीनुसार, प्रत्येक स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकरणात पुरुषांचे प्रमाण एक टक्के आहे. जागरूकतेअभावी स्तनांच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू जास्त आहेत; परंतु लीकडच्या काळात पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाला महत्त्व दिले जात आहे.

loading image
go to top