पुरुषांना सीओपीडीचा वाढता धोका; डॉक्टरांचा इशारा | COPD Patients update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

COPD Decease

पुरुषांना सीओपीडीचा वाढता धोका; डॉक्टरांचा इशारा

मुंबई : प्रत्येक सहाव्या रुग्णाला फुप्फुसाचा आजार (Lung decease) असल्याचे निदर्शनास आले आहे. छातीच्या ओपीडीला भेट देणाऱ्या सर्वेक्षणातून (Chest opd survey) ही बाब समोर आली असून यासाठी धूम्रपान घातक (smoking kills) ठरत असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करतात. मुंबईत क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजेच सीओपीडीचे (Mumbai COPD Patients) वाढते प्रमाण आहे. वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी तसेच त्याबाबत जागरूकता निर्माण केली जाते.

हेही वाचा: मोखाडा : जव्हार मधील जुन्या पोलीस वसाहतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

क्रेस्ट या दीर्घकालीन फुफ्फुसांच्या आजारांच्या क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणासाठी कार्यरत संस्थेतर्फे 44 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये "स्क्रीन" नावाचा आठवडाभर चालणारा सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज) स्क्रीनिंग कार्यक्रम आयोजित केला. सीओपीडी साठी भारतातील हा पहिला देशव्यापी स्क्रीनिंग कार्यक्रम आहे. त्यात छातीच्या ओपीडीला भेट देणाऱ्या प्रत्येक सहाव्या रुग्णाला सीओपीडी असल्याचे लक्षात आले.

त्यानुसार, भारतात अंदाजे 50 दशलक्ष लोक सीओपीडी सह जगत आहेत. हे भारतात होण्या-या मृत्यूंपैकी दुसरे प्रमुख कारण आहे. भारतात दररोज 2400 पेक्षा जास्त लोक सीओपीडीमुळे मरतात, जे क्षयरोग (1157), मधुमेह (748) आणि एचआयव्ही-एड्स (126) या सर्वांमुळे होणा-या मृत्यूंपेक्षा अधिक आहे. 2019 च्या जीबीडी अहवालानुसार भारतात तंबाखूच्या धूम्रपानामुळे होणाऱ्या सीओपीडीचे प्रमाण 29% आहे तर भारतात वायु प्रदूषणामुळे होणा-या सीओपीडीचे प्रमाण 53.3% आहे.

या सर्वेक्षणाअंतर्गत छाती विकार विभागाला भेट देणाऱ्या प्रत्येक रुग्णाची सीओपीडी साठी स्क्रीनिंग टूल वापरून तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 8 प्रश्नांचा संच आणि पीक फ्लो मीटर चाचणीचा समावेश होता. ज्यांची तपासणी पॉझिटिव्ह आली त्यांची स्पायरोमेट्री चाचणी घेण्यात आली होती. स्पायरोमेट्रीमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्यांना नंतर उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला देखील देण्यात आला. सीओपीडीचे अंतिम निदान स्पायरोमेट्री आणि वैद्यकीय महाविद्यालयातील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केले होते. यात असे आढळून आले की 2440 रुग्णांनी तपासणीसाठी ओपीडीला भेट दिली त्यापैकी प्रत्येक 6 व्या रुग्णाला सीओपीडी चा त्रास होता. ज्यामध्ये 75% पुरुष आणि 25% महिला होत्या.

काय आहे सीओपीडी ?

क्रेस्टचे संचालक डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले की, “ सीओपीडी हा एक जुनाट, प्रगतीशील फुफ्फुसाचा आजार आहे ज्यामध्ये अधूनमधून तीव्रता वाढते, ज्याला फुफ्फुसाचा झटका असेही म्हणतात, जो अनेकदा प्राणघातक ठरू शकतो. हानिकारक प्रदूषकांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे होतो ज्यामुळे श्वासोच्छवासाच्या नळ्या आणि फुफ्फुसाच्या काही भागाला नुकसान पोहोचते. कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन, स्वयंपाकासाठी बायोमास इंधन जाळल्याने घरगुती वायू प्रदूषण, मच्छर कॉइल जाळणे, मोटार वाहनांच्या बाहेर पडणाऱ्या वातावरणातील वायू प्रदूषणाचा दीर्घकाळ संपर्क, उद्योगाचा धूर, रस्त्यावरील धूळ आणि धुळीच्या ठिकाणी काम करणे हे सीओपीडीला आमंत्रित करते. बालपणात वारंवार होणारे श्वसनमार्गाचे संक्रमण,वेळीच उपचार न मिळाल्यास तसेच दम्याचा विकार ही सीओपीडीची इतर कारणे आहेत.

loading image
go to top