esakal | कांदिवलीत पावसाचा धुमाकूळ, एकाच चाळीत 9 झोपड्या जमीनदोस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Rains

नाल्याला बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या वरून पाणी जात होते. वस्तीमध्ये जवळपास 6 ते 7 फुटा पर्यंत पाणी शिरले होते.

कांदिवलीत पावसाचा धुमाकूळ, एकाच चाळीत 9 झोपड्या जमीनदोस्त

sakal_logo
By
चंद्रशेखर जाधव

मालाड - कांदिवली (पु) हनुमान नगर मध्ये रात्रभर पाऊस पडल्याने शिवनेरी चाळीतील 9 झोपड्या जमिनदोस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. रात्री 1. 30 वाजता भरधाव वेगाने पाणी झोपडपट्टीत घुसले. जीवित हानी झाली नसली तरी घरातील मौल्यवान वस्तू, कपडे, महत्वाची कागदपत्रे यांचे मोठ्या प्रमामावर नुकसान झाले. तसेच त्रिमूर्ती चाळ, ममता सोसायटी, मिलिंद वसाहत मध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सदर वस्तीच्या बाजूने जाणारा नाला (पोईसर नदी) तुडुंब भरल्याने. पुराचे पाणी आत शिरले. झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळावी असे आव्हान अपातग्रस्त करीत आहेत.

श्रीराम नगर पासून ते महिंद्रा गेट दरम्यान सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मालाड (पु) व कांदिवली (पु) मधून येणारे पाणी याच मार्गाने येत असल्याने नाल्याला बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या वरून पाणी जात होते. वस्तीमध्ये जवळपास 6 ते 7 फुटा पर्यंत पाणी शिरले होते. अचानक रात्रीच्या वेळेला आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने घरातील किमती वस्तू तसेच महत्वाची कागदपत्रे वाहून गेली असे स्थानिकांनी सांगितले.

पावसाने आमच्या शिवनेरी चाळीत पाणी घुसले 9 घरे पडली यात माझेही घर होते. संपूर्ण संसारच पाण्याखाली गेला आहे. काहीही शिल्लक राहिले नाही. आता राहायचे कुठे खायचे काय असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. पालिकेने ताबडतोड लोकांची व्यवस्था करावी.लोक बेघर झाले आहेत. आमच्या पर्यंत सरकार पोहोचलेच नाही असेच म्हणावे लागेल. तर दुसरीकडे गांधी नगर मधील लुकमान चाळ, मस्जिद चाळ, आझाद चाळ येथेही नाल्याचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचं भागचंद्र जाधव या स्थानिक रहिवाशाने सांगितलं.

हेही वाचा: ठाणे - दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

काल पासून इथल्या लोकांना पिण्याचे पाणीही मिळाले नाही लोक दिवसभर घरातील पाणी उपसा करीत आहेत. काही लोकांना मस्जित मधून पाणी देण्यात आले. इकडे पालिकेचे किंवा कलेक्टरचे अधिकारी फिरकलेच नाही. स्थानिक नगरसेवक एकनाथ (शंकर) हुंडारे यांनी पालिकेतर्फे जेसीबी आणून परिसर साफ केला मात्र लोकांचे झालेले नुकसान मोठे आहे. याबाबत पालिका व कलेक्टर द्वारे सर्व्हे व्हावा व नुकसान भरपाई मिळावी अशी अब्दुल मस्जिद शेख या स्थानिक नागरिकाने व्यक्त केली. तर शासनाने लवकर या नाल्याचे काम करावे जेणेकरून हा त्रास पुन्हा लोकांना होणार नाही असे मत राम सुरेमान यांनी व्यक्त केले.

पावसाने लोकांचे खूप नुकसान झाले आहे. याबाबत मी विभागात सतत लोकांच्या संपर्कात आहे. लवकरच पालिका, पोलीस, कलेक्टर यांची संयुक्त बैठक मी घेणार आहे. आपापाडा व क्रांती नगर, दामू नगर येथून पाणी आल्याने यावेळी मोठया प्रमाणात पाणी आले. पोईसर नदी म्हणून या नाल्याची ओळख आहे. या नाल्याचे रुंदी करण्याचे काम सुरू आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दुसरीकडे पर्यायी निवारा किंवा विकासकामार्फत भाडे देणे अशी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पी उत्तर विभागातील एस आर ए कामे प्रगती पथावर आहे मात्र कांदिवलीच्या आर साऊथ विभागात विकासकांची कामे होत नसल्याने मोठी अडचण होत आहे. मात्र या पावसाने लोकांचे जे नुकसान झाले आहे याबाबत संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून नागरिकांसाठी काम करू असं नगरसेवक एकनाथ हुंडारे यांनी म्हटलं आहे.

loading image