आयआयटीयन्सची कचऱ्यातून वीज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पाणी जिरवून विघटन
कचरा डेपोमध्ये पावसाचे पाणी जिरवून कचऱ्यातील आर्द्रतेमुळे गडद रंगाचे द्रव निर्माण होते. त्या द्रव्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. द्रव्यामध्ये अनेक प्रकारचे जैव (ऑरगॅनिक) आणि निरिंद्रिय रसायने असतात. त्याच्या विघटनातून ऊर्जा मिळू शकते. त्या ऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी होऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

मुंबई - ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून प्रदूषण वाढत आहे. दोन्ही प्रमुख समस्यांवर उपाय म्हणून मुंबई आयआयटीचे प्राध्यापक प्रकाश घोष आणि त्यांच्या संशोधन टीमने कचऱ्यापासून तयार होणाऱ्या द्रवाचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला आहे. त्यांचे संशोधन सरकारने स्वीकारले, तर पर्यावरणाचा ऱ्हास आणि विजेच्या भारनियमनापासून नागरिकांची सुटका होऊ शकेल.

देशातील बहुतांश शहरांमध्ये कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा नाही. त्यामुळे वायू आणि जलप्रदूषण होत आहे. त्याचा परिणाम एकूण पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होत असून मानवी जीवनालाही त्याची झळ पोहचत आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आयआयटीमधील प्राध्यापकांच्या टीमने कचरा साठवून त्यातून जमा होणाऱ्या द्रव्यापासून वीज बनविण्याचा प्रयोग यशस्वी केला.

कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या दाव्याबाबत संशोधक जयेश सोनवणे म्हणतात, की सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेचा खर्च कमी करणे आणि कचऱ्यातून मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्यावर संशोधन सुरू आहे. कचरा डेपोमध्ये तयार होणाऱ्या द्रव्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करता येते. त्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्म जीवाणू जैव पदार्थाचे ऑक्‍सिडीकरण करतात. त्या तत्त्वावर सूक्ष्म जीवाणू इंधन सेल काम करतात. त्या सेलच्या धनाग्र आणि ऋणाग्रामध्ये एक पातळ पटल असते. ज्यातून धन विदल प्रवाहित होऊ शकतात. संपूर्ण संच एका द्रावणात बुडविला जातो. जेव्हा सूक्ष्म जीवाणू संयुगांचे विघटन करतात तेव्हा धनप्रभार आणि ऋणप्रभार असलेले कण निर्माण होतात. ते कण विरुद्ध प्रभार असलेल्या अग्रांकडे आकर्षित होतात. प्रभार असलेल्या कणांच्या प्रवाहामुळे वीज निर्माण होते. या प्रक्रियेत आतापर्यंत ५३४ मिनिव्होल्टेज तयार करण्यात आले आहे.

पाणी जिरवून विघटन
कचरा डेपोमध्ये पावसाचे पाणी जिरवून कचऱ्यातील आर्द्रतेमुळे गडद रंगाचे द्रव निर्माण होते. त्या द्रव्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. द्रव्यामध्ये अनेक प्रकारचे जैव (ऑरगॅनिक) आणि निरिंद्रिय रसायने असतात. त्याच्या विघटनातून ऊर्जा मिळू शकते. त्या ऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी होऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai IIT professor Prakash Ghosh and his research team created electricity from the waste