
मुंबई : गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ
मुंबई: उन्हाळा वाढला की अंगाची काहिली होते. यातच अनेक जण रस्त्यावरील सरबत, शीतपेय, कापलेली फळे खाताना दिसतात; पण त्यासाठी वापरले जाणारे पाणी स्वच्छ आहे की नाही, याची खबरदारी घेतली जात नाही. परिणामी पालिकेच्या आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये गॅस्ट्रोचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. उन्हाळ्यात सर्वाधिक गॅस्ट्रो आणि उष्माघाताच्या रुग्णांची नोंद होते.
अतिसार झालेल्या व्यक्तीने टॉयलेट वापरल्यानंतर हात स्वच्छ न धुतल्यास हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीलाही होऊ शकतो. दर आठवड्याला डीहायड्रेशनमुळे त्रस्त किमान दोन ते तीन रुग्ण आमच्याकडे उपचारांसाठी येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणाऱ्या डिहायड्रेशनकडे दुर्लक्ष करू नका, यामुळे गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी माहिती झेन रुग्णालयाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. मेघराज इंगळे यांनी दिली.
वाढत्या तापमानामुळे, बालरोगतज्ज्ञ आता व्हायरल इन्फेक्शन्समध्ये वाढ नोंदवत आहेत. ज्यामुळे अतिसार, तसेच हात, पाय आणि तोंडाचे आजार होत आहेत. डॉक्टरांच्या मते, मुलांमध्ये अतिसाराच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ रोटाव्हायरसमुळे आहे, एक एन्टरोव्हायरस ज्यामुळे गंभीर अनियंत्रित अतिसार होतो, ज्यामुळे गंभीर निर्जलीकरण आणि मृत्यूदेखील होतो. बाहेरचे सातत्याने खाणे हे या मागचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
सल्लागार बालरोगतज्ज्ञ, डॉ. सुभाष राव यांच्या म्हणण्यानुसार, अतिउष्णतेमुळे लहान मुलांवर गंभीर परिणाम होतो. जसजशी उष्णता वाढते, तशी मुले अनेक प्रकारे आजारी पडू शकतात. शरीरातील द्रवपदार्थ कमी झाल्यामुळे उष्माघात, अतिसार, मळमळ, उलट्या, स्नायू दुखणे आणि निर्जलीकरण यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, तसेच गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत मुलांमध्ये अतिसाराची नोंद होत आहे.
पोटाच्या विविध समस्या
उन्हाळ्यात केवळ उष्माघात, डोळ्यांचे संक्रमण, ॲसिडिटी आणि डीहायड्रेशनच नाही, तर गॅस्ट्रोएन्टेरिटिसदेखील होतो. जेव्हा तापमानाचा पारा चढतो तेव्हा पोटदुखीच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसून येते.
गॅस्ट्रो एन्टराटिस हा पचनमार्ग, पोट आणि आतड्यांचा त्रास आणि जळजळ यांसारखी लक्षणे दर्शवतो. हे आजार विषाणूजन्य जिवाणू, परजीवी, उघड्यावरील अन्नपदार्थ, अन्न विषबाधेमुळे तसेच दूषित पाण्यामुळे होतो.
उन्हाळ्यात उष्णता वाढली की गॅस्ट्रोएन्टेरिटिसची प्रकरणे वाढतात; पचनसंस्था मंदावते, ज्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात.
अन्न दूषित असल्याने उलट्या आणि अतिसारासह पोटदुखीसारखी अन्न विषबाधेची लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे २ ते ५ दिवसांपर्यंत टिकतात, असे गॅस्ट्रो स्पेशालिस्ट डॉ. मृदुल धरोड यांनी सांगितले.
पालिकेच्या केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातही पोटदुखीने त्रस्त रुग्ण दाखल होत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
कोणती काळजी घ्याल?
दुपारी मुलांना घराबाहेर पाठवणे टाळा. आपल्या शरीरातील योग्य द्रव पातळी राखा. निरोगी पदार्थांचे सेवन करा. उष्णतेमुळे मुलांच्या शरीराचे तापमान खूप जास्त असल्यास त्यांना आंघोळ घाला.