व्यापाऱ्याकडून खंडणी प्रकरणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व हवालदार अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

व्यापाऱ्याकडून खंडणी प्रकरणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व हवालदार अटकेत

मुंबई : मुंबईच्या जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील कार्यरत दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक सुनील वर्तक आणि पोलिस हवालदार विजय गायकवाड या दोन पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.तक्रारीवर तातडीने कारवाई करत पोलिसांनी शनिवारी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली.

पोलिसांकडून वसुली

गिरगावातील व्हीपी रोडवर राहणारे व्यापारी महेंद्र पटेल त्याच्या चुलत भावासह काही व्यावसायिकांना भेटायला जात असताना दोन्ही आरोपी पोलीसानी त्याना अडवले. आरोपी पोलिसांनी पिडीत व त्यांच्या भावाला पोलिस व्हॅनमध्ये बसण्यास सांगून कोणालाही फोन न करण्याची ताकीद दिली. पिडीत व त्याच्या भावावर विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन, दोघांनी त्याच्याकडून 50 हजार रुपयांची मागणी केली. पिडीत व्यक्तीने सुटकेसाठी शेवटी 10 हजार रुपये दिले. या घटनेची हकीकत महेंद्र पटेल यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली.

ट्विरनंतर पोलीस कारवाई

या ट्विटनंतर, पटेल यांच्याशी मुंबई पोलिसांच्या वेब सेलने संपर्क साधला. पोलिसांनी पटेलांकडून तपशीलांसह ते जेजे मार्ग पोलिस स्टेशनला दिले. त्यानंतर पोलिसांनी पटेल यांना चौकशीसाठी बोलावले आणि त्यांच्या जबाबाच्या आधारे, सहायक उपनिरीक्षक सुनील वर्तक आणि पोलिस हवालदार विजय गायकवाड या दोन पोलिसांची ओळख पटवत दोघांना शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे,’