Mumbai News: नितीन गडकरी येण्याआधी एकच रस्ता कधी नव्हे तो चकाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai News

Mumbai News: केंद्रीय मंत्री येण्यापूर्वी त्यांच्या येणाऱ्या व जाणारे रस्ते केले चकाचक

डोंबिवली : अस्वच्छतेमुळे माझ्या पाहणीतलं सगळ्यात घाणेरडे शहरांपैकी एक शहर हे डोंबिवली आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात काही वर्षापूर्वी केले होते. आज कल्याण मध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरी स्वतः येणार आहेत. रस्त्यांच्या दुरवस्था वरून कल्याण शहरावर मंत्री काही बोलू नये म्हणून पालिका प्रशासनाने कधी नव्हे तो अत्रे रंगमंदिर बाजूचा रस्ता चकाचक केला आहे. या रस्त्यावरील फेरीवाले सगळे हटविले असून रस्त्यावर मार्गदर्शक पट्टे ही मारण्यात आले आहेत. हा एकच रस्ता नीट केल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कल्याण मध्ये येत आहेत. अस्वच्छता आणि खराब रस्ते यावरून मंत्री गडकरी पालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित करून टीका करू नये यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रातोरात सूत्र हलवीत गडकरी येणार असलेले मार्ग चकाचक केले आहेत.(Mumbai News)

सकाळी उठल्यावर नागरिकांना रस्त्यावर हे वेगळे चित्र दिसत असल्याने कोणी मंत्री येणार आहे का अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत. मंत्री येणार असतील तरच शहरातील रस्ते चकाचक होतात असे नागरिक सांगतात. शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था असून अनेक ठिकाणी कचरा देखील साचलेला असतो. मात्र मंत्री येणार ते रस्ते असे दाखविले जातात की शहर अत्यंत स्वच्छ आहे.

आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमास मंत्री गडकरी येणार असल्याने पालिकेने कुंभारवाडा नाका हा रस्ता चकाचक केला आहे. तसेच या रस्त्यावरील फेरीवाले हटवत पदपथ मोकळे करण्यात आले आहेत. तसेच या रस्त्यावर मार्गदर्शक पट्टे देखील आखण्यात आले आहेत.