'या' रेल्वे स्थानकावरील 10 रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आता 50 रुपयांना

कुलदिप घायवट
Wednesday, 3 March 2021

मुंबई विभागातील महत्वाच्या 7 रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म रेल्वे तिकीट देण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 वरून 50 रुपये करण्यात आले आहे. 

मुंबई: रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद केले होते. मात्र, वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सोडण्यास येणाऱ्या नातेवाईकांसाठी मुंबई विभागातील महत्वाच्या 7 रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म रेल्वे तिकीट देण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 वरून 50 रुपये करण्यात आले आहे. 

कोरोच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी रेल्वे स्थानकावर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि खबरदारीकरिता भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पाच पटीने वाढवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर लॉकडाऊननंतर प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद केले होते. मात्र वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी त्यांच्या नातेवाईक रेल्वे स्थानकांवर येत होते. मात्र त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश नसल्यामुळे मुंबई महानगरातून मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांच्या तक्रारी मध्य रेल्वेला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म रेल्वे तिकीट सुरु करण्यात आले आहे. 

मध्य रेल्वेच्या प्रमुख 7 रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्यात आले आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांच्या समावेश आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले होते. मात्र त्यानंतर 23 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण देशाची रेल्वे प्रवासी वाहतूक ठप्प होती. जून 2020 पासून देशभरात विशेष गाड्या चालवण्यात आलेल्या होत्या. तेव्हा फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात येत आहे. तसेच आता कोरोचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी आणि उन्हाळ्यात रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रेल्वेचा हा निर्णय गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आलेला आहे,  अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- मुंबईतल्या 'या' 29 खासगी रुग्णालयात मिळणार कोरोना लस, वाचा संपूर्ण यादी

मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 रुपये वरून 50 रुपये करण्यात आले होते. आता भारतीय रेल्वेकडून आता सर्व रेल्वे गाड्या हळूहळू सुरू होत आहे. तरीसुद्धा प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद केले. मात्र, गर्भवती आणि वयोवृद्ध प्रवाशांच्या गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागातील 7 रेल्वे स्थानकावर 15 जूनपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

प्लॅटफॉर्म तिकिटाची वाढती मागणी पाहता आणि कोरोनोच्या संकटकाळी स्थानकावर गर्दी होऊ नये, म्हणून ही सुविधा केवळ मुंबई विभागाच्या सात स्थानकावर उपलब्ध केली आहे. कोरोना काळात प्लॅटफॉर्म तिकिट विक्री अजूनही इतर स्थानकावर बंद आहे.
शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai key railway stations Platform Ticket price raised 50 rs Indian railways


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai key railway stations Platform Ticket price raised 50 rs Indian railways