
Mumbai : खालापूरमध्ये १३० वीटभट्ट्या संकटात
खालापूर : अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वीटभट्टी व्यवसायाला बसला असून पावसात कच्ची विटेची पुन्हा माती झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. मंगळवारी आलेल्या मुसळधार पावसाने रचून ठेवलेल्या कच्च्या विटेची रास उद्ध्वस्त झाली.
चौक, खोपोली, खालापूर, मोहपाडा, सावरोली या भागात मुसळधार पाऊस पडला. तालुक्यात जवळपास १३० वीटभट्टी व्यावसायिक आहेत. तालुक्यातील पूर्वीचा शेतकरी जोडधंदा म्हणून वीटभट्टी व्यवसायाकडे वळला आहे. नुकसानीनंतर सरकारच्या कोणत्याही भरपाई योजनेत वीटभट्टी व्यवसाय पात्र ठरत नसल्याने अवकाळीच्या संकटाने व्यावसायिक हवालदिल झाला आहे.
हजार कच्च्या विटांसाठी ५०० रुपये मजुरी
तालुक्यात वीट भट्टीवर काम करण्यासाठी आदिवासी, दुर्गम भागातील कुटुंबे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. दिवस उगवायाच्या आधी वीट तयार करायला सुरवात होत असून चार ते सहा पाच माणसे दिवसाला हजार कच्च्या वीटा तयार करतात. हजार विटांमागे त्यांना ५०० रुपये मजुरी मिळते. तर ठोकळा वीट पाडण्यासाठी हजार विटांमागे हजार रुपये मजुरी मिळते.
पुणे, कोल्हापुरातून तूस खरेदी
अनेकदा वीटभट्टी मालक मजूर कुटुंबाला कामाचे एकत्रित पैसे देतात, मात्र काही जण पैसे घेउन पळ काढत असल्याने व्यवसाय तोट्यात जातो. तालुक्यात १३० पैकी ८८ वीटभट्ट्या सुरू आहेत. पूर्वी सहज मिळणारा तूसही मिळेनासा झाला असून पुणे,कोल्हापूर यासारख्या भागातून टनाला हजार रुपये देऊन तूस खरेदी करावे लागतो. याशिवाय कोळशाच्या किमतीही वाढल्या असून १३ हजार रुपये टन दराने उपलब्ध होत असल्याने व्यवसाय तोट्यात असल्याचे वीटभट्टी व्यावसायिक सांगतात.
रायगडमधील विटेला शहरात विशेषतः नवी मुंबईत मोठी मागणी आहे. परंतु अवकाळीमुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे वीटभट्टी व्यवसाय टिकून राहणे अवघड झाले आहे.
- रामदास कायमकर, वीटभट्टी व्यावसायिक, वावंढळवाडी-चौक