esakal | Mumbai | अधिवेशनाच्या तोंडावर आझाद मैदानावर आंदोलकांना नो एंन्ट्री; मैदान रिकामे करण्याच्या नोटीस 

बोलून बातमी शोधा

Mumbai | अधिवेशनाच्या तोंडावर आझाद मैदानावर आंदोलकांना नो एंन्ट्री; मैदान रिकामे करण्याच्या नोटीस }

एक मार्चपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असतांना, आझाद मैदानावर आंदोलने, सभांना मनाई करण्यात आली आहे.

Mumbai | अधिवेशनाच्या तोंडावर आझाद मैदानावर आंदोलकांना नो एंन्ट्री; मैदान रिकामे करण्याच्या नोटीस 
sakal_logo
By
दिनेश मराठे-चिलप

मुंबई  ; एक मार्चपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असतांना, आझाद मैदानावर आंदोलने, सभांना मनाई करण्यात आली आहे. सध्या मैदानावरील सुरु असलेल्या आंदोलकांना मैदान तात्काळ खाली करण्यास सांगीतले आहे. मैदान खाली न केल्यास आंदोलकाविरुध्द कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे आझाद मैदान पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान मैदानावर बसलेल्या आंदोलनकर्त्यावर पोलिसी बळाचा वापर योग्य नसल्याचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सकाळशी बोलतांना सांगीतले आहे.

अधिवेशनाच्या तोंडावर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या  मैदानावरील आंदोलनकर्त्यांनाही तात्काळ मैदान खाली करण्याच्या नोटीस बजावल्या गेल्यात.नोटीसीचा भंग केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188,269 सह साथ रोग अधिनियम कलम 3 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 ( 1 ),135 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे. आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विदयासागर कालकुंद्रे यांनी  ही नोटीस  बजाविली आहे. दरम्यान मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,उपायुक्त मीणा यांनी आझाद मैदानात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी मैदानावरी आंदोलकांची समजूतही काढण्याचा प्रयत्न केला. 

सध्या राज्यात कोविड संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून, राज्यात दररोजची  कोरोना रुग्णांची संख्या 8 हजारावर पोहोचली आहे. मुंबईतही कोरोना रुग्ण संख्या हजारावर पोहोचली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रम सभा, आंदोलने,मोर्चे यांवर निर्बध घालण्यात आले .आझाद मैदानावर मोठया प्रमाणात लोक एकत्र येतात, आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान आझाद मैदानात राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात असून ते शिरस्त्राण,ग्लास फाइबर शील्डसह सज्ज आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

सध्या आझाद मैदानात वनविभागात नोकरीत कायम करण्यात यावे यासाठी वनकर्मचारी गेल्या 11 दिवस निदर्शने करीत आहेत. तर संगणक राज्य संगणक परिचालक संघटनेचे सदस्य आझाद मैदानावर आले आहेत. 

.....
विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात , राज्यभरातून विवीध कामगार, कर्मचाऱी संघटना त्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर मोर्चे काढतात,आंदोलन करतात. अधिवेशन काळात सरकारचे लक्ष त्यांच्या समस्येकडे ओढून घेण्याचा हा प्रयत्न असतो. यापुर्वी  कोरोनामुळे विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी  कमी होता. त्यामुळे यावेळी तरी आंदोलने करण्यासाठी वेळ मिळेल अशी आशा आंदोलकांना होती.मात्र ती धुळीस मिळाल्याचे आंदोलकर्त्याचे म्हणणे होते. 

एकीकडे मंत्री मोर्चे काढतात, मी निरपराध आहे यासाठी शक्तीप्रदर्शन करतात.कॉग्रेसचे नवे पदाधिकारी भव्य, दिव्य कार्यक्रमात उपस्थित राहतात.थियेटर सुरु झाले. दारु, बियर बार सुरु आहे. मात्र दुसरीकडे आझाद मैदानातील आंदोलनाने कोरोना पसरतो, हा अदभुत शोध आहे. आणि शोधाचा संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संशोधन पेपर संयुक्त राष्ट्रसंघाकडे पाठवले तर  डॉक्टरपेक्षा कपांऊडरला जास्त समजते या म्हणीवर शिक्कामोर्तब होईल 
सुधीर मुनगंटीवर 
माजी अर्थमंत्री 

वनमजूर वनकामगार यांना न्याय मिळावा म्हणून गेले 11 दिवस  आम्ही आझाद मैदानात आंदोलन करत आहोत. मात्र आता  कोरोनाची भिती दाखवत पोलिसांनी बाहेर जाण्यास सांगीतले आहे. आम्ही कोविड नियमावली पाळून आंदोलन करतोय, तरीही आम्हाला हुसकावून लावण्याचा हा प्रकार आहे. 
रामचंद्र भिसे ,
वनकर्मचारी 

आता कुणालाही आझाद मैदानात प्रवेश मिळणार नाही. तुर्तास आझाद मैदान आंदोलकांसाठी बंद आहे. जुन्या आंदोलकांना मैदान सोडण्याचे निर्देश दिले आहेत.वरीष्ठांचे वेगळे आदेश आले तर विचार करु. 
विदयासागर कालकुंद्रे
वरीष्ठ पो, निरिक्षक ,आझाद मैदान पोलिस स्टेशन

--------------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane ) 

mumbai latest marathi news No entry to protesters at Azad Maidan ahead of the convention live update