esakal | मुंबईतील पासधारक लोकल प्रवाशांना दिलासा देणारी बातमी

बोलून बातमी शोधा

mumbai local
मुंबईतील पासधारक लोकल प्रवाशांना दिलासा देणारी बातमी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, कुलदीप घायवट

मुंबई: उपनगरीय रेल्वे मार्गावरून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास मनाई केली आहे. अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी काढलेल्या पासचे काय होणार, अशी चिंता सतावत होती. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांनी काढलेल्या पासची मुदतवाढ करण्यात येणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी नियमित लोकल सुरू झाल्यानंतर ही मुदतवाढ केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

एक फेब्रुवारीपासून राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांना पहिल्या लोकलपासून ते सकाळी 7, दुपारी 12 ते दुपारी 4 आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यत प्रवास करण्याची मर्यादीत वेळ ठरविण्यात आली. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वसामान्य प्रवाशांनी लोकलचे मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक पास काढण्यास सुरूवात झाली होती. मात्र, राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस यांच्यावतीने सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यासपासून मज्जाव केला जातो.

हेही वाचा: महाराष्ट्रातील लॉकडाउनमध्ये १५ मे पर्यंत वाढ; राजेश टोपेंची माहिती

परंतु, सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सुरू झाल्यानंतर लोकल पासची मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. लोकलचा नियमित प्रवास सुरू होताच प्रवाशांना जुन्या पासद्वारे नुतनीकरण केलेले पास मिळणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. सर्वसामान्य प्रवाशांनी काढलेले लोकल पासची मुदत वाढ होणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

मागच्यावेळी ज्याप्रमाणे पासची मुदतवाढ करण्यात आली होती, त्याप्रमाणे सर्वसामान्य लोकल प्रवाशांना त्यांच्या पासची मुदतवाढ केली जाणार आहे. ज्यावेळी नियमित लोकल प्रवास सुरू होईल, त्यावेळी पासची मुदतवाढ केली जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.