esakal | Mumbai Train: आवाज नाही उठविला तर, उपासमारीची वेळ येणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Train

Mumbai Train: आवाज नाही उठविला तर, उपासमारीची वेळ येणार

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : सरकार, प्रशासनाकडे (Government) वारंवार मागणी करून, निवेदने देऊन, फलके हाती घेऊन लोकल सुरू करण्याची मागणी केली. मात्र, लोकल (Mumbai Train) अद्याप सुरू झाली नाही. परिणामी, प्रवाशांनी आता समाज माध्यमांचे (Social Media) शस्त्र हाती घेतले आहे. समाज माध्यमावरून लोकलट्रेन सुरू करा, असा हॅशटॅग वापरून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेसबुक, टिट्वर, व्हाॅट्सअँप यावरून #लोकलट्रेनसुरूकरा असा हॅशटॅग प्रसारित केला जात आहे. आता आवाज नाही उठविला तर, उपासमारीची (Starvation) वेळ येणार; किती हाल सोसायचे, आता तरी लोकल सुरू करा, असे मत प्रवाशांकडून (Travelers) समाज माध्यामावर व्यक्त केले जात आहे. ( Mumbai local Train doesn't start for Common travelers Starvation will start-nss91)

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल सुरू करा, खासगी नोकरदार वर्ग, कष्टकरी, कामगार वर्ग यांच्यासाठी नियोजित वेळेत लोकल प्रवास सुरू करा, अशी वारंवार मागणी सरकार, प्रशासनाकडे केली गेली आहे. सरकारला निवेदने दिली आहेत. मात्र, सरकार, प्रशासन लोकल सुरू करण्याबाबत उदासीन असल्याचे मत प्रवाशांकडून मांडले जात आहे. निवडणूकीत धडा शिकवू, मतदानावर बहिष्कार टाकू असे आवाहन केले असताना देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे समाज माध्यमाद्वारे लोकल सुरू करण्याचा लढा सुरू केला आहे, अशी भूमिका रेल्वे प्रवासी संघटनांनी मांडली.

लोकलमध्ये सर्वसामान्य कामगार, नोकरी, कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रवासी वाहतुकीची सुविधा मिळावी, यासाठी आता समाज माध्यमांवर 'राईट टू ट्रॅव्हल्स चळवळ' उभारण्यात आली आहे. नागरिक आणि प्रवासी सुद्धा ह्या लढ्यात सामील होऊ शकतात #लोकलट्रेन_सुरूकरा हा हॅशटॅग जास्त प्रमाणात वापरला जात आहे. अनेक तरूण नवीन लागलेल्या नोकऱ्या टिकविण्यासाठी आणि नोकरीच्या शोधात असलेले तरूण या हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. फेसबुकवरील अनेक पेज लोकल सुरू करण्यासाठी सरकारकडे मागणी करत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: ...अन्यथा 50 काेटींचा मानहानीचा दावा दाखल करु, भाजपचा इशारा

मागील तीन महिन्यांपासून लोकल सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे आर्थिक हाल सहन होत नाही. आता फक्त काही क्षेत्रातील नोकरदार वर्गाचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे इतर नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी पर्यायी वाहनांचा वापर करावा लागतोय. परिणामी, अतिरिक्त वेळ आणि जास्तीचे पैसे वाया जात आहेत. त्यामुळे सरकारने लोकल तत्काळ सुरू करावी.

- रत्नेश चुंबळे, प्रवासी

सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मात्र, वारंवार लॅपटॉप वापरून आता लॅपटाॅप खराब झाला आहे. त्यामुळे आता लॅपटॉप बदलायचा आहे. त्यासाठी कार्यालयात जायचे आहे. मात्र लोकल बंद असल्याने लॅपटॉप बदलून कसा आणायचा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे सरकारने नियोजित वेळेत लोकल सेवा सुरू करावी. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी प्राधान्याने लोकल सुरू करावी.

- करूणा राई, प्रवासी

सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये नियोजित वेळेत लोकल सेवा सुरू केली होती. त्याचप्रमाणे आता पुन्हा लोकल सेवा सुरू केली पाहिजे. महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यास पर्यायी वाहनांमधील गर्दी कमी होईल. तसेच पर्यायी वाहनात महिलांना होणारा त्रास कमी होईल. त्यामुळे सरकारने, प्रशासनाने लोकल सेवा सुरू केली पाहिजे. समाज माध्यमाद्वारे लोकल सुरू करण्याचा लढा सुरू केला आहे.

- सायली चव्हाण, प्रवासी

loading image