esakal | CSMT ते बोरिवली प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; MUTP प्रकल्पांना गती येणार
sakal

बोलून बातमी शोधा

CSMT ते बोरिवली प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; MUTP प्रकल्पांना गती येणार

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) हाती घेतलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) प्रकल्पांना मागील वर्षीपेक्षा 100 कोटी रुपयांची जादाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

CSMT ते बोरिवली प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; MUTP प्रकल्पांना गती येणार

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई  : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) हाती घेतलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) प्रकल्पांना मागील वर्षीपेक्षा 100 कोटी रुपयांची जादाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. एमयूटीपी 3-अ प्रकल्पाअंतर्गत हार्बर रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव आणि पुढे बोरिवलीपर्यंतच्या मार्गाचा विस्तार करण्याच्या कामाला गती मिळण्याची शक्‍यता आहे. 

हार्बर रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव या मार्गाचा विस्तार 2018 मध्ये पूर्ण झाला. या मार्गावरील अंधेरी ते गोरेगाव या मूळ योजनेची घोषणा 2009 मध्ये करण्यात आली होती. परंतु, ही कामे डिसेंबर 2017 मध्ये पूर्ण झाली. हार्बर उपनगरी मार्गावरील गाड्या बोरिवलीपर्यंत नेण्याची योजना एमयूटीपी 3-अ अंतर्गत आखण्यात आली आहे. यासाठी 825.58 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एमयूटीपीच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. त्यातील 100 कोटी रुपये निधीची एमयूटीपी 3 (अ)साठी तरतूद करण्यात आली आहे. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अंधेरी ते गोरेगाव या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी असतात. त्यामुळे उपनगरी गाड्यांना मोठी गर्दी असते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बोरिवलीपर्यंत थेट प्रवास करता आल्यास मुंबईकरांची मोठी सोय होईल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. 

विरारपर्यंत विस्तार? 
पश्‍चिम रेल्वेवरील बोरीवली ते विरारपर्यंत पाच आणि सहा मार्गिका बनविण्याचे नियोजन एमयूटीपी 3 य अ मध्ये करण्यात आले आहे. सध्या बोरिवलीपर्यत पाच मार्गिका आहेत. तर, सहावा मार्गही होणार आहे. तर, आणखी हार्बरच्या दोन मार्गिकांचीही भर पडेल. त्यामुळे बोरीवलीपर्यंत आठ मार्गिका होतील. बोरिवलीपर्यंत हार्बरचा मार्ग तयार झाल्यानंतर हा मार्ग विरारपर्यंतही हार्बरवरून नेण्याची योजना रेल्वे प्रशासन तयार करीत असल्याची माहिती उच्चपदस्थांकडून देण्यात आली. 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
mumbai local train latest update marathi expansion of the harbor railway line Borivali