
मुंबई : रेल्वे प्रवासी व्याकुळ
मुंबई - मुंबई महानगरात तापमानाचा पारा चाळिशी पार झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांचा मारा मुंबईकरांना सहन होत नाही. रेल्वे प्रवासात प्रवाशांना घामाच्या धारा लागलेल्या असतात. या कडक उन्हात तहान मोठ्या प्रमाणात लागते. मात्र, पाणपोई, वॉटर व्हेंडिंग मशीन बंद असल्याने थंडगार पाणी पिण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकावर वणवण करावी लागत आहे. मध्य रेल्वेने मागील दोन वर्षांपासून लिंबू सरबतावर बंदी आणली आहे. थंडगार पाणी पिण्यासाठी आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिलेल्या वॉटर व्हेंडिंग मशीन धूळ खात पडल्या आहेत. मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांवर पाणपोईची सुविधा आहे. मात्र, काही पाणपोई पाण्याअभावीच उभ्या आहेत; तर काही पाणपोईंमध्ये गरम पाणी बाहेर येते. सीएसएमटी, दादर, कुर्ला, एलटीटी, माटुंगा, मुलुंड, कांजूरमार्ग आणि विद्याविहार यांसारख्या अनेक रेल्वे स्थानकांवर पाणपोईची संख्या कमी असल्याने प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर पाणी पिण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मध्य रेल्वेच्या ५५ स्थानकांवर एकूण ८१ वॉटर व्हेडिंग मशीन होत्या. मात्र खासगी कंपनीचे कंत्राट संपल्याने या मशीन आता धूळ खात पडल्या आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबत सुविधा, वॉटर व्हेंडिंग मशीन सुरू करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत आहे. उन्हाचा त्रास प्रवाशांना होत आहे. यामुळे रेल्वेने पाणपोईची संख्या वाढवली पाहिजे. यासह वॉटर व्हेंडिंग मशीन लवकरात लवकर सुरू करायला हवी.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.
उन्हाळा आता असह्य होऊ लागला आहे. रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्थानकात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पूर्वी पाणपोई, वॉटर व्हेंडिंग मशीनद्वारे थंड पाण्याची सुविधा पुरविली जात होती. मात्र या दोन्ही सुविधांचा रेल्वे स्थानकांवर अभाव दिसून येत आहे.
- विशाल शेळके, प्रवासी.
रेल्वे स्थानकांवर पाणपोई शोधण्यासाठी वणवण करावी लागते. आता मोजक्याच स्थानकांवर पाणपोईची सुविधा आहे. इतर स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन धूळ खात पडलेल्या आहेत.
- महेश जाधव, प्रवासी.
Web Title: Mumbai Local Train Water Vending Machines At Stations Closed Passenger Disturbed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..