रेल्वे मार्गावर महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, आठवड्याभऱ्यात विनयभंगाच्या दोन घटना

प्रशांत कांबळे
Monday, 30 November 2020

गेल्या एका आठवड्यात दोन महिलांसोबत विनयभंगाच्या घटना घडल्या असल्याने, रेल्वे मार्गावरील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा ऐरणीवर आला. आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईः कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वे मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरसकट महिलांनाच प्रवासाची परवानगी आहे. मात्र, गेल्या एका आठवड्यात दोन महिलांसोबत विनयभंगाच्या घटना घडल्या असल्याने, रेल्वे मार्गावरील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा ऐरणीवर आला. आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर 23 नोव्हेंबर रोजी 11.48 वाजता भाईंदर ते कांदिवली लोकल प्रवास करताना बोरिवली दरम्यान महिलेचा विनयभंग करून तिला लुटण्याची घटना घडली. तर 25 नोव्हेंबर रोजी आटगांव ते कसारा दरम्यान रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान प्रवास करताना, दोघा तरूणांनी तिचा विनयभंग करून तिला लोकलमधून बाहेर फेकण्याची घटना समोर आली. या दोन्ही प्रकरणातील आरोपीचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशी काही संबंध नाही. शिवाय सरसकट पुरूषांना अद्याप रेल्वे लोकल प्रवासाला परवानगी दिली नाही.

राज्य सरकारने सुचवलेल्या घटकातीलच प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी असताना, लोकल मधून गर्दुले, व्यसनी, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सामान्य नागरिकांचा लोकल प्रवास कसा होतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि मुंबई रेल्वे पोलिसांचा कोविड 19 च्या काळात कडेकोट बंदोबस्त असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेने सांगितले होते. मात्र, महिलांच्या सुरक्षेवरून दोन्ही रेल्वे मार्गावरील सुरक्षा ढिसाळ झाल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाची बातमीः  २०१५ साली मुंबई- उपनगरात सर्वाधिक मृत्यू प्रमाण, माहिती अधिकारातून बाब उघड

दोन्ही मार्गावरील प्रवासी संख्या

मध्य रेल्वे मार्गावर कोविड पूर्वी 45 लाख प्रवासी दैनंदिन प्रवास करत होते. तर कोविड काळात आता 6 लाख प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर कोविड 19 पूर्वी 35 ते 36 लाख प्रवाशांचा दैनंदिन प्रवास केला जात होता. आता, कोविड काळात 6 लाख 5 हजार 546 प्रवासी दैनंदिन प्रवास करत आहे.  
 
लोकल फेऱ्यांची संख्या

मध्य रेल्वे मार्गावर कोविडपूर्वी एकूण 1774 फेऱ्या धावायच्या, त्यापैकी आता 1580 फेऱ्या सुरू आहे. त्याप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर आधी एकूण 1367 त्यापैकी 1201 सुरू आहे. अशा दैनंदिन एकूण 2781 लोकल फेऱ्यांमधील महिलांच्या डब्यांची सुरक्षा जीआरपी पोलिसांवर आहे.

जीआरपी पोलिसांचे कार्यक्षेत्र

दैनंदिन मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण 80 लाख प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी जीआरपी पोलिसांची आहे. सुमारे 476 किलोमीटरचे कार्यक्षेत्र जीआरपी पोलिसांचे आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोर्डी, मध्य रेल्वे वर सीएसएमटी ते कसारा-खोपोली, हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते पनवेल असे आहे.
 
महिलांच्या डब्यात स्कॉडिंग करण्याचे काम जीआरपी पोलिसांचे आहे. आरपीएफचे काम रेल्वे स्थानकांवर सुरक्षा देणे आणि महिलांच्या डब्यांची तपासणी करण्याचे आहे. सध्या हार्बर, ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर जास्त प्रवासी नसल्याने एकट्या महिलांना सुरक्षेच्या दृष्टीनं सूचना दिल्या जाते. महिला डबे तपासले जाते. आसणगांव रेल्वे स्थानकांसारखे अनेक रेल्वे स्थानक खुले असल्याने रात्रीच्या वेळेत असे प्रवासी कुठूनही घुसून लोकल प्रवास करत आहे.
के के अशरफ, आयुक्त, आरपीएफ

महिलांच्या सुरक्षेचे जबाबदारी फक्त जीआरपीची नाही. तर आरपीएफ आणि जीआरपी दोघांचीही आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपी पकडण्यात आले आहे. त्यावरील कारवाई सुरू आहे. 100 टक्के महिला डब्यांमध्ये सायंकाळी 6 नंतर जीआरपी पोलिसांची ड्युटी लावण्याच्या सूचना दिल्या आहे. कोरोनाच्या काळामुळे अधिकारी, कर्मचारी आजारी आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळामध्ये उत्तमरित्या काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रविंद्र शेनगांवकर, आयुक्त, जीआरपी 

महत्त्वाची बातमीः  व्याजाच्या पैशांसाठी गोळीबार; बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर दोघांना अटक

रेल्वे प्रवासातील गुन्हेगारी रोखण्यात स्थानिक आरपीएफ जीआरपी पोलिस यांचा नाकर्तेपणा आहे. वरिष्ठांचा धाक नसल्याने ते त्या स्थानकातील जहागिरीच मिळाली या थाटात वावरतात. जोपर्यंत गुन्हे घडल्यावर तेथील जबाबादार पोलिस कर्मचा-यावर  निपक्षपातीतून  चौकशी होऊन  कडक कारवाई होत नाही. तोपर्यंत त्यांच्या कामाबाबत सुधारणा होणार नाही. सगळेच पोलिस दलातील कर्मचारी बेजबाबदारीने वागतात असे नाही. मात्र बहुसंख्येने आढळतात हे मात्र सत्य नाकारता येणार नाही.

कांचन कुलकर्णी,  महिला प्रतिनिधी,  कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना
 
मुंबई उपनगरीय मार्गावर 80 लाख प्रवाशांना हाताळण्यासाठी केवळ रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे लोहमार्ग पोलिस संख्या मिळून फक्त 10 ते 15 हजाराच्या घरात आहे. त्यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालय राज्य सरकार यांच्यासोबत संख्याबळ वाढविण्याकरीता पाठपुरावा केला. मात्र, रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारची उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कमालीची उदासिनता दिसली. रेल्वे प्रवासातील गुन्हेगारी आणि अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. अपु-या संख्याबळातही जास्तीत जास्त पोलिस हे वरिष्ठ अधिका-यांच्या दिमतीला तैनात असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. महिला, दिव्यांग सदैव असुरक्षित असून, रेल्वे मंत्र्याला केवळ महसुली उत्पनाची भुरळ पडली आहे. प्रवासी सुरक्षा मात्र वाऱ्यावर आहे. 
श्याम उबाळे, अध्यक्ष, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai local train women hurt by men two incidents happened in week


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai local train women hurt by men two incidents happened in week