माथाडी कामगारांच्या रास्त मागण्या मान्य

mathadi-kamgar
mathadi-kamgar

मुंबई : माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीतर्फे २७ मार्च रोजी माथाडी कामगार व सुरक्षा रक्षकाचा महामोर्चा आयोजित केला होता. परंतु, काल 26 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने माथाडी कामगारांच्या रास्त मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना, ''आज मी मंत्रीमंडळाचा प्रतिनिधी म्हणून आपणास हा संदेश देण्यासाठी आलो आहे. येत्या ३ एप्रिल रोजी मंत्रालयात होणा-या बैठकीत या मागण्यांवर कायदेशीर शिक्कामोर्तब होईल''. ते मस्जिद बंदर येथील माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांच्या विजयी मेळाव्यात बोलत होते. 

ते पुढे असेही म्हणाले कि, ''१९९२मध्ये झालेली दंगल माथाडी कामगारांमुळे आटोक्यात आली, म्हणूनच हजारो मुंबईकरांचे प्राण वाचले. अशा या तमाम माथाडी कामगारांना मी वंदन करतो, गेल्या साडेचार वर्षात मंत्री म्हणून काम करताना आज प्रथमच मी आपल्या प्रचंड कामगार शक्तीपुढे शासनाचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. मी सदैव माथाडी कामगार चळवळीच्या मागे उभा राहीन, पुढील वर्षी माथाडी कायद्याला ५० वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्त्ताने राज्य सरकारने सुवर्ण महोत्सव साजरा करावा, अशी मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे''. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटी निधी दिलेला आहे. आणखी ५०० कोटी देण्यात येतील, तसेच लवकरच या महामंडळावर अध्यक्षाची नेमणूक करण्या येईल असेही त्यांनी सांगितले. 

तर या मेळाव्यात बोलताना आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील असे म्हणाले कि, अण्णासाहेबांनी उभारलेली ही माथाडी चळवळ शेवटच्या श्वासापर्यंत टिकली पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. आज मुंबईत ६० ते ७० माथाडी कामगार संघटना आहेत परंतु, अण्णासाहेबांची संघटना अभेद्य आहे. आजचा विजय हा तुमचा आणि आमचा फार मोठा विजय आहे. याचे श्रेय आपल्या सर्व माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांचा आहे. 

माथाडी व सुरक्षारक्षक कामगार बचाव कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबा आढाव आपल्या भाषणात असे म्हणाले की, चळवळीत सध्या उंदरांचा सुळसुळाट फार झाला आहे, त्यांचा बिमोड करण्यासाठी आपण सर्व कामगारांनी सतत जागृत राहिले पाहिजे. मी ५० वर्षे वेगवेगळ्या पक्ष्यांची राजवट पाहत आहे अनेक सरकार येतात व जातात, पण कामगारांच्या मागण्या क्वचितच मान्य होतात. उंदीर मारण्यासाठी गोळ्या खरेदीसाठी पैसे यांच्याकडे आहेत पण कामगारांची लेव्ही देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. मला चहा-बिस्कीटे खायला घातली तरी मी या लोकांना बधणार नाही. आम्हाला दिलेला शब्द यांनी पाळला नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. 

तर युनियनचे कार्याध्यक्ष व माजी जलसंपदामंत्री, आमदार शशिकांत शिंदे या मेळाव्यात बोलताना असे म्हणाले की, आज या व्यासपीठावरून सरकारच्या मंत्री महोदयांनी माथाडी कामगारांच्या व सुरक्षा रक्षकांच्या मागण्या मुख्यमंत्र्याच्या वतीने मान्य झाल्याची ग्वाही दिलेली आहे. यासाठी येत्या ३ एप्रिल रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निर्णय पक्का होईल असे वाटते. परंतु, असे न झाल्यास बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर प्रचंड आंदोलन होईल आणि या आंदोलनाच्या मदतीला शिक्षण मंत्री विनोद तावडेसुद्धा येतील अशी आपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व कामगारमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मागण्या संबधी निर्णायक लेखी आश्वासन घेण्याचा प्रयत्न केला.

या विजयी मेळाव्यास कामगार नेते अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, राजकुमार घायाळ, पोपटराव पाटील, जयवंतराव पिसाळ, तानाजी कदम, नंदाताई भोसले, हणमंतराव सुरवसे, अर्जुनराव दिवाळे, रविंद्र जाधव, हरीश धुरट, विकास मगदूम, सुभाष लोमटे, आप्पा खताळ, सतीशराव जाधव, शिवाजी सुर्वे, लक्ष्मणराव भोसले आदी नेते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून हजारो माथाडी व सुरक्षारक्षक कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य, माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले, तर संघटनेचे जनसंपर्क अधिकारी व सेक्रेटरी पोपटराव देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com