Mumbai : 326 कोटी फक्त 3 रस्त्यांसाठी का बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ? ; राजू पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS MLA Raju Patil Tweet

Mumbai : 326 कोटी फक्त 3 रस्त्यांसाठी का बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ? ; राजू पाटील

डोंबिवली : 326 कोटी, 3 रस्त्यांसाठी ? हे तिन्ही रस्ते रूनवाल व लोढा बिल्डरच्या फायद्यासाठी बांधले जात आहेत का ? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह प्रशासनाला दिला आहे. ग्रोथसेंटर मधील रस्ते करण्याआधी यात बाधित होणाऱ्या 10 गावांना रस्ते व सुविधा द्या अन्यथा विरोध होणार. विकासाला विरोध नाही, फक्त प्राथमिकता ठरवा असेही त्यांनी आपल्या ट्विट मधून सुचविले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या वतीने ई निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुचनेनुसार उसरघर- निळजे - घेसर, निळजे - कोळे - हेदूटने, हेदुटने - माणगाव - भोपर आणि उसरघर - घारीवली या गावांना जोडणाऱ्या चार रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि अनुषंगिक कामांच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून निविदा मागविण्यात आली आहे. 6 ऑक्टोबरपर्यत या निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. 326.62 कोटीं निधीची ही निविदा आहे.

एमएमआरडीए हे कल्याण विकास केंद्र प्रकल्पांतर्गत विकास आराखड्यातील उसरघर- निळजे - घेसर, निळजे - कोळे - हेदूटने, हेदुटने - माणगाव - भोपर आणि उसरघर - घारीवली या गावांना जोडणाऱ्या चार रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि अनुषंगिक कामांच्या बांधकामासाठी कंत्राटदार कडून निविदा मागीवली आहे. या निविदेची प्रसिद्धी केली असून त्यात उसरघर - निळजे - घेसर या रस्त्याचे कामासाठी अंदाजित रक्कम 107.14 कोटी, निळजे - कोळे - हेदुटने आणि उसरघर - घारीवली या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी 123.49 कोटी तसेच हेदुटने - माणगाव - भोपर या रस्त्याच्या कामासाठी 95.99 कोटी निधी असे एकूण 326. 62 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणच्या कामावरून मनसे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि एमएमआरडीएला सवाल केला आहे. हे रस्ते रूनवाल व लोढा बिल्डर च्या फायद्यासाठी बांधले आहेत का ? असा सवाल केला आहे. ग्रोथ सेंटर मधील रस्ते करण्याआधी यात बाधित होणाऱ्या 10 गावांना रस्ते व सुविधा द्या अशी मागणी आमदारांनी केली असून, हे केले नाही तर या कामाला विरोध होणार असा इशारा देऊ केला आहे. विकासाला विरोध नाही फक्त प्राथमिकता ठरवा असे आमदार पाटील यांचे म्हणणे आहे.

काय आहे ट्विट...

326 कोटी, 3 रस्त्यांसाठी ? हे तिन्ही रस्ते रूनवाल व लोढा बिल्डरच्या फायद्यासाठी बांधले जात आहेत का ? ग्रोथसेंटर मधील रस्ते करण्याआधी यात बाधित होणाऱ्या 10 गावांना रस्ते व सुविधा द्या अन्यथा विरोध होणार.विकासाला विरोध नाही,फक्त प्राथमिकता ठरवा.