
Mumbai : सहा मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला अखेर अटक
मुंबई : मागील आठवड्यात शुक्रवारी 25 नोव्हेंबर रोजी मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचार्यांचे सहा मोबाइल फोन पळवणार्या आरोपीला अंधेरी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. आरोपी शोएब शेख असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयातर्फे पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शोएब शेख हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे
अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर एक तपास पथक तयार करण्यात आले आणि तपास सुरू करण्यात आला. तपासात पोलीस पथकाने एका गुप्तचराची मदत घेतली. अंधेरीतील दंडाधिकारी न्यायलयाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासण्यात आले. त्यावरून आरोपीची ओळख पोलिसांनी निश्चित केली. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढे सापळा रचत अंधेरी पश्चिम परिसरात आरोपीला पकडले.
आरोपी शेखने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधेरी पोलिसांनी त्याला 2018 मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती आणि तो जामिनावर बाहेर होता. पोलिसांनी आरोपीला कोर्ट परिसरात चोरी का केली अ विचारले असता, तेथून चोरी करणे त्याच्यासाठी सोपे असल्याचे त्याने सांगितले. मोबाईल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
शुक्रवारी 25 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला कॅन्टीनमध्ये झोपली असताना ही चोरीची घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.